प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) नव्या नियमात समावेश करण्यात आलेला ‘हुकमाचा सामना’ हा स्पध्रेला नवे वळण देईल, असे मत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान असलेल्या सायना नेहवालने व्यक्त केले. डेन्मार्कची क्रिस्टिना पेडर्सेन, बी. साई प्रणिथ, चीनचा चाई यून, इंडोनेशियाचा हेंड्रा गुनावन आणि थायलंडचा बॉडीन इसारा या खेळाडूंचा सायनाच्या संघात समावेश आहे. हा संघ लीगमध्ये प्रतिस्पर्धी संघासमोर कडवे आव्हान उभे करेल, असा विश्वास तिने व्यक्त केला.

‘‘पीबीएलमध्ये जगातील अव्वल खेळाडूंचा समावेश आहे आणि ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे आमच्यात चुरस पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. पण, याही पेक्षा ‘हुकमाचा सामना’ या नव्या नियमाची उत्सुकता अधिक आहे. स्पध्रेला नवे वळण देणारा हा नियम असेल,’’ असे सायना म्हणाली.

पीबीएलला २ जानेवारी २०१६ पासून सुरुवात होणार असून, यामध्ये दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, मुंबई आणि लखनौ अशा सहा संघांचा समावेश आहे.