फक्त संधी निर्माण करणे इतकेच पुरेसे नसते, तर त्याद्वारे गोल साकारणे हेसुद्धा महत्त्वाचे असते. गुरुवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषक फुटबॉल पात्रता सामन्यात भारतीय संघाची सुधारित कामगिरी पाहायला मिळेल, असा विश्वास कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केला.

ई-गटात समाविष्ट असलेल्या भारताच्या खात्यावर आता २ गुण जमा आहेत. गुरुवारी ताजिकिस्तानची राजधानी दुशानबे येथे होणाऱ्या सामन्याद्वारे भारताचे भवितव्य ठरणार आहे. युद्धजन्य परिस्थिती असलेल्या अफगाणिस्तानने मायदेशातील दुसऱ्या सामन्यासाठी दुशानबे हे ठिकाण निश्चित केले आहे.

‘‘संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्याकडे भारताने भर द्यायला हवा. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यातून हाच धडा घ्यायला हवा. ८८व्या मिनिटाला आदिल खानने हेडरद्वारे गोल साकारला नसता, तर भारत या सामन्यात पराभूत झाला असता,’’ असे मत छेत्रीने व्यक्त केले.

‘‘आम्ही अनेक संधी निर्माण केल्या, परंतु त्या पुरेशा नव्हत्या. त्यांचे गोलमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत. बांगलादेशविरुद्ध सामना जिंकण्याची संधी गमावली. आता अफगाणिस्तानला हरवण्याची आवश्यकता आहे,’’ असे छेत्रीने दुबई स्पोर्ट्स सिटी येथील सराव सत्रानंतर सांगितले.

प्रतिकूल परिस्थितीचे भारतापुढे आव्हान -स्टिमॅच

नवी दिल्ली : अ‍ॅस्ट्रो टर्फ, शून्य अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमान यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी फार आव्हानात्मक असेल, अशी प्रतिक्रिया भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच यांनी व्यक्त केली.

‘‘दुशानबे येथील हवामानाची स्थिती भारतातील वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. शून्य अंशापेक्षाही कमी तापमान असल्याने कडाक्याच्या थंडीत खेळणे भारतीय खेळाडूंसाठी आव्हानात्मक असणार आहे. अफगाणिस्तानने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर विजय मिळवणे हेच आमच्यापुढील पहिले ध्येय आहे,’’ असे स्टिमॅच म्हणाले.