बिहारवर आरामात विजय; उपांत्य फेरीत यजमानांची भारतीय रेल्वेशी झुंज

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

केरळविरुद्धच्या लढतीत तुषार पाटील, तर बिहारविरुद्धच्या लढतीत अजिंक्य पवार हे महाराष्ट्राचे तारे चमकले. त्यामुळे ‘अजिंक्य’तेचा विराट नारा देत गतविजेत्या महाराष्ट्राने राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेची दिमाखात उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. आता सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी महाराष्ट्रापुढे भारतीय रेल्वेचे आव्हान समोर असणार आहे.

कबड्डीरसिकांचा उंदड प्रतिसाद लाभलेल्या दत्ताजीराव ग. तटकरे क्रीडानगरीत महाराष्ट्राला सुरुवातीला बिहारने तोलोमोलाची लढत दिली. अजिंक्यची पहिल्याच चढाईत पकड झाल्यानंतर रिशांक देवाडिगा आणि तुषार पाटील यांच्या बिहारने अव्वल पकडी केल्या. परंतु ही पिछाडी भरून काढताना महाराष्ट्राने ११व्या मिनिटाला पहिला लोण देत ११-८ अशी आघाडी मिळवली. मग पूर्वार्धाच्या अखेरच्या मिनिटाला आणखी एक लोण महाराष्ट्राने चढवला. त्यामुळे पहिल्या सत्रात २२-११ अशी आघाडी महाराष्ट्राला मिळवता आली.

दुसऱ्या सत्रात बिहारच्या नवीनची मात्रा चालली नाही. परंतु अजिंक्य आणि रिशांकच्या चढायांमुळे बिहारच्या बचावाचा निभाव लागला नाही. उत्तरार्धात महाराष्ट्राने आणखी एक लोण चढवला.

अजिंक्यने झंझावाती चढायांचे आक्रमण करीत एका बोनस गुणासह एकूण नऊ गुण मिळवले. अनुभवी रिशांकनेही धडाकेबाज चढाया करीत आठ गुण मिळवले. महाराष्ट्राच्या बचावात पाच नेत्रदीपक पकडी करणाऱ्या विकास काळेचे योगदान महत्त्वाचे होते. विशाल मानेने तीन पकडी करीत त्याला सुरेख साथ दिली.

दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत भारतीय रेल्वेने कर्नाटकचा ५३-४२ असा पाडाव केला. अन्य लढतींमध्ये हरयाणाने उत्तर प्रदेशचे आव्हान ४९-४८ असे मोडित काढले, तर सेनादलाने उत्तराखंडला २-३०असे पराभूत केले.

रोह्यात कबड्डी रसिकांचा महापूर

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी बुधवारी उत्साही कबड्डीरसिकांचा महापूर क्रीडानगरीत अनुभवायला मिळाला. गतविजेता महाराष्ट्राचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे, शिवाय प्रो कबड्डी लीगचे तारांकित खेळाडूंचा खेळसुद्धा ‘याची डोळा’ पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे संयोजकांना  नियंत्रण ठेवणे कठीण गेले. क्रीडानगरीत १५ हजार प्रेक्षकांची आसनक्षमता आहे. मात्र बुधवारी सुमारे तीस हजारांहून अधिक कबड्डीरसिकांनी हजेरी लावली. मुरूड, अलिबाग, पेजारी, आदी आसपासच्या गावांहून ही मंडळी आली होती. प्रेक्षकांना आत जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व मार्गावरही गर्दी होती. मॅटच्या गॅलरीला रेलूनसुद्धा बरेच जण उभे होते. त्या मागील प्रेक्षक तर टाचांवर उभे राहून सामन्याचा आस्वाद घेत होते. काही अतिउत्साही प्रेक्षकांनी प्रेक्षागृहाच्या एका कोपऱ्यात लावलेल्या स्क्रिनच्या शेजारून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला. प्रेक्षक मोठय़ा संख्येने येणार, याची जाणीव असल्यामुळे स्टेडियमबाहेर आधीच स्क्रिन आणि खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तिथेसुद्धा ‘हाऊस फुल्ल’ गर्दी जमली होती.

पुडिचेरीसाठी लाखमोलाचा धक्का

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा आपला प्रवास हा साखळी फेरीपर्यंतच असणार याची पुडिचेरी संघाला पक्की खात्री होती. त्यामुळे बुधवारी सकाळी दादरला जाऊन तामिळनाडूला जाणारी थेट रेल्वे पकडण्याची योजना त्यांनी आखली होती. कारण या स्पर्धेला एक लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते. परंतु मंगळवारी रात्री बाद फेरीचे चित्र स्पष्ट झाले. यात पुडिचेरी आणि तामिळनाडू यांना समान गुण मिळाले. परंतु गुणफरकाच्या समीकरणात काही शतांश गुणांनी पुडिचेरीचा संघ सरस ठरला, तर तामिळनाडूचे आव्हान संपुष्टात आले. तांत्रिक समितीचे प्रमुख जगदीश्वर यादव यांनी पुडीचेरी संघाला ही आनंदाची बातमी सांगितली, तेव्हा या लाखमोलाच्या सुखवार्र्तेमुळे त्यांच्या आनंदला पारावार नव्हता. आता हा संघ संपूर्ण स्पर्धा संपल्यानंतर शुक्रवारी सकाळी कल्याणमार्गे घरी परतणार आहे, अशी माहिती रंगा कौशिक या खेळाडूने दिली.

उपांत्य फेरीत महाराष्ट्रापुढे भारतीय रेल्वेचे कठीण आव्हान आहे. या लढतीत जो जिंकेल, तोच विजेता ठरेल. ही लढत आमच्या दृष्टीने सर्वार्थाने महत्त्वाची आहे. या दोन्ही सामन्यात आमच्या बचाव फळीने चोख भूमिका बजावली आहे.

– प्रताप शिंदे, महाराष्ट्राचे प्रशिक्षक