|| प्रगती पाटणकर

काही वर्षांपूर्वी तू २४ तासांत १०० किलोमीटर धावू शकशील, असे कुणी सांगितले असते तर त्यावर माझा विश्वास बसला नसता. पण अशक्य या शब्दातला ‘अ’ काढून टाकतो आणि ही अशक्यप्राय गोष्ट आपण साध्य करून दाखवतो, त्यानंतर मिळणारा आनंद गगनात मावेनासा होतो. सिंगापूरमध्ये असताना माझा दुसरा मुलगा एक वर्षांचा झाल्यानंतर मी धावायला सुरुवात केली. वेळ मिळेल तसा धावण्याचा सराव करत गेल्यानंतर मला धावण्याची आवड निर्माण झाली.

सुरुवातीला ५ किलोमीटरपासून केलेला जॉगिंगचा सराव काही वर्षांतच ५० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनपर्यंत येऊन पोहोचला. सिंगापूरमध्येच पिंकथॉनचे काम करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर अनेकांना धावण्याविषयी प्रेरणा देत गेले. त्यातच २४ तासांत १०० किलोमीटर धावण्याचे मी ठरवले. यासाठी मला नवऱ्याने साथ दिली. सायकलवरून सर्व आवश्यक सामान घेऊन तो माझ्यासोबत निघाला. माझ्या दोन मुलांनीही या कामासाठी मला चांगली साथ दिली. सुरुवातीला मार्ग निवडण्यावरून माझा गोंधळ सुरू होता. पण सिंगापूरमध्ये सुंदर नॅशनल पार्क आहेत, त्यांना जोडणारे समांतर रस्ते आहेत. जे फक्त जॉगिंग, स्केटिंग आणि सायकलिंगसाठी राखीव आहेत. इथले सरकार सिंगापूरभोवती पार्कला जोडणारा अखंड रस्ता तयार करत आहे. त्यापैकी तयार झालेला रस्ता वापरण्याचे मी ठरवले.

घरापासून ७ किलोमीटर अंतरावर ‘श्री रामार’ नावाचे रामाचे आणि हनुमानाचे देऊळ आहे. तेथूनच सुरुवात करून तिथेच शेवट करण्याचे मी ठरवले. सुरुवात केल्यानंतर दक्षिणेकडील प्रसिद्ध ‘ईस्ट कोस्ट पार्क’पासून ते ‘गार्डन्स बाय द बे’ या पर्यटन स्थळापर्यंत मी २६-२७ किलोमीटरचे अंतर कापले. माझ्या अनेक मैत्रिणींनी माझ्यासोबत धावून मला साथ दिली. ३० किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर ‘लौ पा सात’ या ठिकाणी जाऊन मी जेवण आणि विश्रांती घेतली. हातापायाला शेक दिल्यानंतर पुन्हा सुरुवात केली. वाटेत अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्तीमुळे मला लांबचा रस्ता कापावा लागला. माझा वेग कमी होऊ लागला होता. पण सिंगापूरमधील सोयीसुविधांमुळे माझा थकवा काहीसा कमी झाला.

वेस्ट कोस्ट पार्कहून पश्चिमेकडे जात असताना जुराँग लेक या प्रसिद्ध तलावाकडे पोहोचल्यानंतर एका मैत्रिणीने मला जुराँग ईस्ट भागात साथ दिली. तिच्यासोबत मी ४८ किलोमीटरचे अंतर कापले होते. त्यानंतर उत्तरेकडील चोआ चुकांग आणि क्रांजी चा परिसरानंतर मी वुडलँड्स व सेंबावांग गाठले. तोपर्यंत ७७-७८ किलोमीटरचे अंतर पार केले होते. उन्हाचे चटके जाणवू लागल्यानंतर मी लिंबू सरबताचे तीन ग्लास प्यायले. भर दुपारी रणरणत्या उन्हात उत्तर पूर्वेकडील पुंगोल परिसरात मला जायचे होते. सेंबावांगपासूनचा महामार्गालगत लांबलचक असलेला हा रस्ता माझी कसोटी पाहणारा ठरला. अधिकचे पाणी प्यायल्याने पोटात दुखू लागले. त्यामुळे १०० किलोमीटरचे अंतर आता अशक्य वाटू लागले होते.

पुंगोल वसाहत नजरेस पडल्यानंतर माझा धीर आणखीनच खचत गेला. पण मन सावरत पुंगोल परिसर मागे टाकल्यानंतर मी घडय़ाळ पाहिले तर ९४-९५ किमी अंतर कापल्याचे मला कळाले. त्यानंतर मनाला हुरूप मिळाला आणि शेवटचे २ किमीचे अंतर अगदी जोरात धावून पार केले. घडय़ाळात १०० किमी अंतर कापल्याचे दिसल्यानंतर मी सुटकेचा नि:श्वास सोडला. माझी दौड रामार मंदिराजवळ संपणार असल्यामुळे आणखीन अंतर मला कापायचे होते. अखेर दौड संपवली याचे समाधान आहेच. सर्वच जण आयुष्य घडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. पण त्यातून आपल्या वाटय़ाला आनंदाचे क्षण येतात का? त्यामुळे मनस्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्य जपले तर त्यातून आयुष्याचा आनंद नक्कीच लुटता येईल. त्यामुळेच धावत राहा, निरोगी राहा, आनंदी व्हा!