मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतासाठी फक्त एकच ट्वेन्टी-२० सामना खेळला, पण तरीही क्रिकेटच्या या प्रकाराबद्दल तो भरभरून बोलताना दिसतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटने क्रिकेटला अधिक मनोरंजक बनवले असून त्यामुळे कसोटी सामने अधिकाधिक निकाली ठरण्यास मदत होत आहे, असे मत सचिनने व्यक्त केले आहे.
‘‘ क्रिकेट हा एकच खेळ असा आहे की त्यामध्ये तीन प्रकार आहेत आणि फक्त खेळाडूंसाठीच नाही तर प्रेक्षकांसाठीही हा प्रकार रंजक ठरत आहे. हा प्रकार सर्जनात्मक असून त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्येही निकालांचे प्रमाण वाढले आहे. ‘ट्वेन्टी-२०’मुळेच फलंदाज अधिकाधिक संधी घेण्यासाठी तयार झाले आहेत,’’ असे सचिन कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात म्हणाला.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने याबाबत मतप्रदर्शन करताना सांगितले की, ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटचा परिणाम कसोटी क्रिकेटवर झाला आहे. खेळाडू अधिकाधिक आक्रमक क्रिकेट खेळायला लागले असून त्यामुळे निकालांमध्ये वाढ झाली आहे.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे खेळामध्ये नावीण्य, कल्पकता आली आहे. पण जेव्हा कसोटी क्रिकेटची गोष्ट येते, तेव्हा तुम्हाला जुळवून घ्यावे लागते, कारण कोणतेही दोन खेळाडू तांत्रिकदृष्टय़ा सारखे नसतात. खेळाडूंनी त्यांच्या मूळ तत्त्वांपासून दूर जाऊ नये, तेच अधिक महत्त्वाचे आहे.’’
भारताचा माजी कप्तान राहुल द्रविड म्हणाला की, ‘‘आतापर्यंत बरेच ट्वेन्टी-२० सामने खेळलो आहे, त्यामुळे मला असे वाटते की क्रिकेटपटूंनी या नवीन प्रकारांकडून येणाऱ्या मागण्या आत्मसात करायला हव्या.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२०मुळे तुम्ही काही नवीन फटके खेळायला शिकता. जसे मी कसोटी क्रिकेटमध्ये केले, तसा इथे फटक्यांना आवर घालायचा नसतो. चांगले खेळाडू झटपट शिकून आत्मसात करतात. ख्रिस गेल. माइक हसी किंवा ए बी डि’व्हिलियर्स यांच्या गेल्या आयपीएलच्या खेळी पाहा. ते चांगले कसोटी खेळले असूनही त्यांची आयपीएलमध्ये मक्तेदारी सिद्ध केली. त्यामुळेच मला वाटते मूळ गोष्टी योग्य असायला हव्यात.’’
सचिन पुढे म्हणाला, ‘‘मी पहिल्यांदा २००३ साली ड्रेसिंग रूममध्ये लॅपटॉप पाहिला आणि मी अचंबितच झालो. क्रिकेट शिकण्यासाठी तंत्रज्ञान तुम्हाला मदत करू शकते हे ऐकून मला आश्चर्य वाटले होते. पण कालांतराने मला याचे महत्त्व जाणवायला लागले. तंत्रज्ञानाचा खेळी उभारण्यासाठी चांगलाच फायदा झाला आहे.’’
फक्त कामगिरीवर निवड अवलंबून नसावी. काही वेळा दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली गेली, पण त्यांना त्याचा फायदा उचलता आला नाही. काही खेळाडू स्थानिक पातळीवर दमदार कामगिरी करतात, पण त्यांना मोठय़ा स्तरावर चांगली कामगिरी करता येत नाही. पाच वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बॅट हातात धरली व देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. क्रिकेटच्या वेडापायीच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तुमचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
-सचिन तेंडुलकर
इम्रान हा माझ्या युगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू -हॅडली
बंगळुरू : कपिल देव, इयान बोथम, इम्रान खान आणि मी अष्टपैलू खेळाडू म्हणून तो काळ गाजवला. परंतु इम्रान हा माझ्या युगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होता, असे न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू सर रिचर्ड हॅडलीने सांगितले.‘‘या चार खेळाडूंपैकी सर्वोत्तम कोण, असे मला कुणी विचारले, तर मी इम्रानचेच नाव घेईन. चतुरस्र फलंदाजी, क्षमताधिष्ठित आघाडीचा गोलंदाज आणि चमत्कारी व्यक्तिमत्वाचा संघनायक हे गुण त्याच्यात होते,’’ असे हॅडलीने सांगितले. ‘‘फलंदाज म्हणून तो पहिल्या सहापैकी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायचा. परिस्थितीचा अंदाज घेऊन तो आश्चर्यकारक खेळी साकारायचा,’’ असे हॅडली म्हणाला.