‘बीसीसीआय’च्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रस्ताव; ‘आयसीसी’कडे निर्णयासाठी एक महिन्याच्या मुदतीची मागणी

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम निर्णय एक महिन्याने घ्यावा, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्राचा सर्वोत्तम पर्याय शनिवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.

दूरचित्रसंवादाद्वारे ५० मिनिटे चाललेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ‘आयपीएल’ आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक या दोन महत्त्वाच्या विषयांवर बिनविरोध निर्णय घेण्यात आले. सर्वच सदस्यांना विश्वचषक स्पर्धा भारतात व्हावी असे वाटते. या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबईतील तीन आणि पुण्यात एक अशा चार मैदानांवर स्पर्धा होऊ शकेल, असा प्रस्ताव चर्चेत आला. परंतु ही स्पर्धा महाराष्ट्रात झाल्यास पाकिस्तानबाबतचा निर्णय हा राजनैतिक पातळीवर घ्यावा लागेल.

‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला १ जूनला दुबईत होणाऱ्या ‘आयसीसी’ कार्यकारी मंडळाच्या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा निर्णय घेण्यात येईल. ‘आयसीसी’ने निर्णयासाठी एक महिन्याची (१ जुलैपर्यंत) मुदत द्यावी, असा प्रस्ताव ‘बीसीसीआय’कडून मांडण्यात येणार आहे. सद्यस्थितीत देशामधील करोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमधील स्थितीचा दावा करून अंतिम निर्णय मे महिन्यातच घेणे घाईचे ठरेल, असे बैठकीत मांडण्यात आले.

भारतीय संघास योजनाबद्ध विलगीकरण बंधनकारक -‘आयसीसी’

दुबई : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघाला योजनाबद्ध विलगीकरण बंधनकारक असेल, असे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आहे. साऊदम्पटन येथील हॅम्पशायर बाऊल मैदानावर भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून या कालावधीत कसोटी जेतेपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सध्या इंग्लंडमध्ये आहे. परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ देशातच १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण करून ३ जूनला इंग्लंडमध्ये पोहोचणार आहे.

रणजीपटूंच्या नुकसान भरपाईवर तोडगा

रणजीपटूंच्या नुकसान भरपाईचा विषय विशेष सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. नुकसान भरपाईचा मुद्दा वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. आर्थिक वाटपाचे सूत्र निश्चित न झाल्यामुळे रणजीपटूंची भरपाई प्रलंबित आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन ‘बीसीसीआय’कडून देण्यात आले.