‘आयपीएल’च्या आयोजनाचा मार्ग मोकळा; ‘आयसीसी’ कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आज फैसला

ऑस्ट्रेलियात या वर्षी होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२२मध्ये लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन करण्यास वेळ मिळेल. या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रमुख कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होण्याची अपेक्षा आहे.

या दोन्ही निर्णयांना गुरुवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली तर करोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व संलग्न सदस्य देशांना आगामी महिन्यांतील आपल्या नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा तयार करता येईल. ‘‘आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. फक्त याबाबतची अधिकृत घोषणा गुरुवारी होणे बाकी आहे. सद्य:परिस्थितीत यंदाच ही स्पर्धा घेणे अशक्य आहे. यावर्षीच ही स्पर्धा घेण्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलिया किंवा आयसीसीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मनात नाही,’’ असे ‘आयसीसी’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

ख्रिस टेटली यांच्या अध्यक्षतेखालील ‘आयसीसी’च्या कार्यक्रम समितीने ट्वेन्टी-२० विश्चषक स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध पर्याय ठेवले असून ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२मध्ये खेळवण्याचा गांभीर्याने विचार ते करत आहेत. त्यामुळे भारतात नियोजित वेळापत्रकानुसार २०२१मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य होईल. करोनामुळे ओढवलेले आर्थिक संकट काही अंशी दूर करण्यासाठी भारतीय संघ यावर्ष अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकेल, असेही या समितीचे म्हणणे आहे.

‘‘फक्त संलग्न देशांनाच नव्हे तर आयसीसीच्या सर्व स्पर्धाचे तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भारतातील क्रिकेट स्पर्धाचे आणि आयपीएलचे प्रक्षेपण हक्क असलेल्या स्टार स्पोर्ट्स या प्रसारण वाहिनीलाही आपला तोटा भरून काढता येईल. अनेक प्रश्नांवर गुरुवारच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे,’’ असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

‘बीसीसीआयच्या’ एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘प्रक्षेपण हक्कांबद्दल तसेच ‘आयपीएल’ला ऑक्टोबर-नोव्हेंबर तसेच पुढील वर्षी मार्च-मे महिन्यात कसे स्थान द्यायचे, यावरही चर्चा केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यात तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धा होणार आहेत. सद्य:परिस्थितीत या सर्वाचे आयोजन अशक्य वाटत आहे. भारतीय संघ वर्षअखेरीस ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार असून दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेचे भवितव्य हे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या भूमिकेवर अवलंबून असेल.’’

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ३ डिसेंबरपासून?

भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चार ठिकाणांची घोषणा केली असून पहिला कसोटी सामना ३ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे, असे वृत्त ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स शुक्रवारी या दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान पाहुण्या भारतीय संघाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार नाही, असेही समजते. ब्रिस्बेननंतर अ‍ॅडलेड (११ डिसेंबरपासून), मेलबर्न (२६ डिसेंबर) तसेच सिडनी (३ जानेवारी) येथे हे चार कसोटी सामने खेळवण्यात येतील.

२०२१ ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी करसवलत?

भारतात २०२१मध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला केंद्र सरकारकडून किती करसवलत मिळेल, याविषयीचे चित्र करोनामुळे अद्याप स्पष्ट होऊ न शकल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून किती प्रमाणात करसवलत देण्यात येईल, याविषयीही ‘आयसीसी’च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. २०१६ विश्वचषक स्पर्धेतील कर परताव्याचा मुद्दा अद्यापही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. करसवलत देण्याबाबतची अंतिम मुदत डिसेंबर २०१९मध्ये संपुष्टात येणार होती. पण देशाच्या विद्यमान कर प्रणालीमुळे बीसीसीआयला काहीही करता आलेले नाही. त्यामुळे आता पुढील दोन महिन्यात कार्याध्यक्षाची निवड झाल्यानंतरच हा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे.

कार्याध्यक्ष निवडीची प्रक्रिया

शशांक मनोहर यांचा ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदाचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार असून या पदासाठीची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. या पदासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष कॉलिन ग्रेव्हज हे उत्सुक असले तरी ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. ‘बीसीसीआय’ने याविषयीची अधिकृत घोषणा केली नसली तरी ‘गांगुलीमध्ये जागतिक क्रिकेट संघटनेचा कार्याध्यक्ष बनण्याची क्षमता आहे,’ असे संकेत ‘बीसीसीआय’चे खजिनदार अरुण धुमाळ यांनी दिले आहेत.