अमिराती आणि ओमानच्या पर्यायाविषयी विचार सुरू

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) गेल्या आठवड्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान ‘बीसीसीआय’ला विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी २८ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली. परंतु देशातील करोनाची स्थिती अद्यापही गंभीर असून ऑक्टोबरमध्ये भारतात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वचषक भारताबाहेर खेळवण्याबाबत ‘बीसीसीआय’चा अंतिम निर्णय जवळपास झाला असून लवकरच ते ‘आयसीसी’ला याविषयी अधिकृतरित्या कळवतील, असे समजते.

‘‘विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने ‘आयसीसी’कडे मुदत वाढवून मागितली होती. परंतु आता २८ जूनपर्यंत थांबण्यापेक्षा त्यापूर्वीच ‘बीसीसीआय’ ‘आयसीसी’ला विश्वचषक भारताबाहेर खेळवण्याबाबत कळवण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती पाहता आयोजनाची सूत्रे भारताकडेच राहतील, परंतु स्पर्धा अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

अमिराती येथील अबू धाबी, दुबई आणि शारजा येथे सामने खेळवण्याबरोबरच ओमानची राजधानी मस्कॅट येथेही विश्वचषकाच्या काही लढती खेळवण्याबाबात ‘आयसीसी’ विचार करत आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामातील उर्वरित लढतीसुद्धा अमिरातीत रंगणार आहेत. त्यामुळे विदेशी खेळाडू भारताच्या तुलनेत अमिरातीला प्राधान्य देऊन विश्वचषकासाठी येतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १६ संघांपैकी एकाही संघातील खेळाडूला स्पर्धेदरम्यान करोनाची लागण झाल्यास संपूर्ण स्पर्धा रद्द करावी लागू शकते. त्यामुळे ‘बीसीसीआय’ आणि ‘आयसीसी’ भारतात विश्वचषकाचे आयोजन करण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता कमी आहे. त्याशिवाय अमिरातीत विमान प्रवास टाळता येणे शक्य असून तेथील करोनाची स्थिती भारताच्या तुलनेत उत्तम असल्यामुळे विश्वचषक भारताबाहेर खेळवणेच उत्तम ठरेल.    – ‘बीसीसीआय’चा पदाधिकारी