करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्मचाऱ्यांना ३० जूनपर्यंत रजा दिली असली तरी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि भारताविरुद्धच्या मालिकेबाबत ते आशावादी आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेचे आर्थिक वर्ष १ जुलैला सुरू होते आणि ३० जूनला संपते. परंतु क्रिकेट सामने थांबल्यामुळे संघटनेने कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. करोनामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर करण्यासही विलंब केला होता. परंतु परिस्थिती सुधारल्यास  रिक्त स्टेडियममध्येही ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सामने खेळवण्यास तयार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

‘‘करोनामुळे २०१९-२०चा क्रिकेट हंगामाचा उत्तरार्ध अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. त्यामुळे व्यावसायिक भागीदार आणि अन्य मार्गाने मिळणाऱ्या महसुलात तोटा सहन करावा लागला आहे. परंतु तरीही २०२०-२१च्या पुरुष आणि महिला क्रिकेट सामन्यांसाठी आम्ही आशावादी आहोत. करोनाचे संकट दीर्घकाळ राहिल्यास ट्वेन्टी-२० विश्वचषक रिक्त स्टेडियममध्येही खेळवण्यात येऊ शकतो किंवा प्रेक्षकांसाठी विशिष्ट अंतराचे नियम करावे लागू शकतात,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले आहे.

प्रेक्षकांविना विश्वचषक आश्चर्यकारक ठरेल -कॅरी

करोनाच्या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणखी लांबणीवर टाकणेच योग्य ठरेल. प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा आश्चर्यकारक ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीने व्यक्त केले आहे.

अ‍ॅडलेड ओव्हलमधील हॉटेल सज्ज

करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीतही विलगीकरण केंद्राची क्षमता असलेले अ‍ॅडलेड ओव्हलमधील नवे हॉटेल भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेचे प्रमुख किथ ब्रॅडशॉ यांनी ही माहिती दिली. परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला १४ दिवसांचे विलगीकरण अनिवार्य आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर १४ दिवस आधी निघावे लागेल. ओव्हलमधील या हॉटेलमध्ये १३८ खोल्या उपलब्ध आहेत. याशिवाय नेटमधील सरावाची व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे.

.. तर ३० कोटी डॉलर्सचे नुकसान

ऑस्ट्रेलियामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सीमाबंदी करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मालिका खेळू शकला नाही, तर टीव्ही प्रक्षेपणद्वारे मिळणाऱ्या ३० कोटी डॉलर्स रकमेवर त्यांना पाणी सोडावे लागेल. याचप्रमाणे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.