कबड्डी या हमखास सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या खेळात भारताने दोन सुवर्णपदकांसह आशियाई स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. भारतीय पुरुषांना सलग सातवे सुवर्णपदक मिळवण्यासाठी मात्र इराणच्या कडव्या संघर्षांला सामोरे जावे लागले, तर भारतीय महिला संघाने इराणवर सहज मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. कबड्डीतील दोन सुवर्णपदकांनंतर भारताची आशियाई स्पर्धेतील अभियानाची सांगता झाली. भारताने ११ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह एकूण ५७ पदके मिळवत पदकतालिकेत आठवे स्थान प्राप्त केले आहे.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताने इराणची झुंज २७-२५ अशी मोडीत काढली. संपूर्ण सामन्यावर इराणने वर्चस्व गाजवले; पण शेवटच्या काही मिनिटांत भारताने जोमाने पुनरागमन करत इराणच्या घशातून विजयाचा घास हिरावून घेतला. इराणने पहिल्याच चढाईत गुण मिळवत खाते खोलले. त्यानंतर इराणने मागे वळून न पाहता भारताचा बचाव भेदला. सातव्या मिनिटाला इराणने भारतावर पहिला लोण चढवत १३-७ अशी भक्कम आघाडी घेतली. मध्यंतराला इराणकडे २१-१३ अशी आघाडी होती. जसबीर सिंग, अनुप कुमार आणि राकेश कुमार यांच्या सुरेख खेळामुळे मध्यंतरानंतर भारताने गीअर बदलला. कर्णधार राकेशने मोक्याच्या क्षणी दोन गुण मिळवत दोन यशस्वी पकडीही केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने लोणची परतफेड करत पिछाडी १९-२१ अशी कमी केली. अखेरची सहा मिनिटे शिल्लक असताना भारताने २४-२४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारताने भन्नाट खेळ करत दोन गुणांच्या फरकाने हा सामना जिंकल्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. भारताने या सामन्यात इराणवर एक लोण, २ बोनस गुण, चढायांचे १४, तर पकडीचे ९ गुण असे २७ गुण मिळवले.
भारताच्या महिला कबड्डी संघाने इराणचे कडवे आव्हान ३१-२१ असे सहज परतवून लावत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने आठव्या मिनिटालाच इराणवर लोण देत १२-७ अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरापर्यंत भारताने ही आघाडी १५-११ अशी वाढवली. मध्यंतरानंतर भारताने दुसरा लोण चढवत २६-१६ अशी भक्कम आघाडी घेतली. ५ मिनिटे शिल्लक असताना भारत २८-१६ अशा आघाडीवर होता. अखेर १० गुणांच्या फरकाने भारताने बाजी मारली. भारताने इराणवर दोन लोण, चढाईत १८, तर पकडीत ९ गुण मिळवले. भारताची कर्णधार तेजस्विनी हिने १४ चढायांत ६ गुण मिळवले. महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रेने ८ चढायांत ५ गुण मिळवले, पण चढाईसाठी तिचा अपेक्षेनुसार उपयोग करून घेता आला नाही. किशोरी शिंदेने ४ यशस्वी पकडी करताना मध्यरक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली. उजवा मध्यरक्षक म्हणून ती प्रतिस्पध्र्यापुढे भिंत म्हणून उभी होती.
हक्काने मिळवलेले अखेरचे सुवर्णपदक!
‘भारताने हक्काने मिळवलेले हे अखेरचे सुवर्णपदक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारत हा कबड्डीचा जन्मदाताच; परंतु गेली आठ वष्रे आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये खेळणाऱ्या इराणची कामगिरी ही थक्क करणारी आहे. दक्षिण कोरियाची कामगिरीसुद्धा कौतुकास्पद झाली’, असे मत अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू राजू भावसार यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘१९९० मध्ये बीजिंगला झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत कबड्डीचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. त्या संघात मीसुद्धा होतो. तेव्हापासून भारताचे कबड्डीतील सुवर्णपदक हमखास असायचे; पण आता भारताला मक्तेदारी टिकवणे कठीण जाणार आहे. इराणने अंतिम फेरीत भारताला दिलेली झुंज ही वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे भारतासाठी ही चिंतेची गोष्ट असली तरी कबड्डीसाठी ही चांगली गोष्ट आहे. आशियात आता कबड्डी योग्य पद्धतीने रुजू लागली आहे, याची ग्वाही यातून मिळाली’. या स्पध्रेतील भारताची अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल सहज झाली तरी पाकिस्तान, बांगलादेश, इराण, दक्षिण कोरिया यांच्यातील सामने विलक्षण चुरशीचे झाले. भारताचा कबड्डीमधील इथपर्यंतचा प्रवास हा सोनेरी आहे; पण इथून पुढे खात्री देता येणार नाही. हॉकीमध्ये जसे घडले, तशीच स्थिती येत्या काही वर्षांत कबड्डीमध्ये निर्माण होईल. कबड्डीचे सुवर्णपदक हक्काचे नसेल, तर ते झुंज देऊन मिळवावे लागणार आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

उत्तम समन्वयामुळे महिला संघाची कामगिरी चांगली झाली. सावध खेळण्याची व्यूहरचना आम्ही आखली होती. आमच्या चढाईपटूंनी छान खेळाचे प्रदर्शन केले. तेजस्विनी बाई, ममता पुजारी आणि अभिलाषा म्हात्रे यांनी योजनेनुसार चढायांचे अप्रतिम गुण कमावले. किशोरी शिंदेने लाजवाब क्षेत्ररक्षण केले.
नीता दडवे, भारताची प्रशिक्षक

आम्ही मागील आशियाई स्पर्धेत आणि विश्वचषकाचे विजेते असल्यामुळे विजेत्याच्या आविभार्वातच अंतिम सामन्यात खेळलो. सुवर्णपदक आम्हालाच प्राप्त करायचे आहे, हा संपूर्ण संघाचा निर्धार पक्का होता. या सांघिक पराक्रमाचेच हे यश आहे.
अभिलाषा म्हात्रे, भारताची खेळाडू

अ‍ॅथलेटिक्स: मंजू बालाचे कांस्य झाले रौप्य
चीनची खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याने हातोडाफेक प्रकारात कांस्यपदक पटकावणाऱ्या भारताच्या मंजू बालाला आता रौप्यपदक मिळणार आहे. हातोडाफेक प्रकारात सुवर्ण आणि रौप्य पदक चीनच्या खेळाडूंनीच पटकावले होते. यापैकी एक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने मंजू बालाला बढती देण्यात आली असल्याचे तांत्रिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मंजूने ६०.४७ मीटर अंतरावर हातोडा फेकला होता. यंदा लखनौ येथे झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथलेटिक् स्पर्धेत २५ वर्षीय मंजूने ६२.७४ अंतरावर हातोडा फेकताना हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती.
तायक्वांदो: तायक्वांदोमध्ये निराशा
शालू राइकवार आणि मार्गारेट मारिया या तायक्वांदोपटूंना उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताची निराशा झाली. ७३ किलो वजनी गटात कुवेतच्या अल्फाहाद अबरार आणि शालू यांच्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत सुटली मात्र पेनल्टी गुण गमावल्याच्या मुद्दय़ावर अबरारला विजयी घोषित करण्यात आले. ७३ किलो वजनी गटातच चीनच्या ली डोनघुआने मारिआवर १५-१ अशी मात केली.
व्हॉलीबॉल: पाचवे स्थान
भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पाचव्या-सहाव्या स्थानासाठीच्या लढतीत भारतीय संघाने कतारवर ३-२ असा विजय मिळवला. भारताने हा मुकाबला २५-२१, २०-२५, २५-२२, २०-२५, १५-१० असा जिंकला. भारतातर्फे गुरिंदर सिंगने सर्वाधिक २० गुणांची कमाई केली.