बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. काल (मंगळवारी) रात्री उशिरा याबद्दलची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली. रवी शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी ही नावेदेखील मुख्य प्रशिक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होती. मात्र रवी शास्त्री यांनी बाजी मारत मुख्य प्रशिक्षकपदाची शर्यत जिंकली. मात्र बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या आणखी दोन नावांमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आश्चर्याचा हा सुखद धक्का दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंच्या निवडीमुळे बसला आहे.

रवी शास्त्री यांच्याकडे पुढील दोन वर्षांसाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा असणार आहे. राहुल द्रविडच्या निवडीमुळे क्रिकेटचाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. भारतीय संघ परदेश दौऱ्यावर त्यांना फलंदाजीचे धडे देण्याची जबाबदारी द्रविडच्या खांद्यावर असेल. ‘द वॉल’ नावाने सुपरिचित असणाऱ्या राहुल द्रविडची निवड पूर्णपणे अनपेक्षित होती. द्रविडच्या निवडीमुळे क्रिकेट रसिकांनी आनंद व्यक्त केला आहे. समाज माध्यमांवर अनेकांनी राहुल द्रविडच्या निवडीचे स्वागत केले आहे.

परदेशात खेळपट्टीवर तग धरताना भारतीय फलंदाजांना अनेकदा अडचणी येतात. विशेषत: आखूड टप्प्यांच्या चेंडूंचा सामना करताना भारतीय फलंदाज डगमगतात. त्यामुळे राहुल द्रविडचे बचावतंत्र परदेश दौऱ्यावर भारतीय फलंदाजांच्या कामी येणार आहे. खेळपट्टीवर दीर्घकाळ तंबू ठोकून फलंदाजी करण्याचे कसब भारतीय फलंदाजांना द्रविडकडून आत्मसात करता येणार आहे. राहुल द्रविडकडे सध्या भारत-अ आणि १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा आहे.

राहुल द्रविडसोबतच झहीर खानची निवडही क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का ठरली. जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवान भारतीय गोलंदाजांमध्ये झहीरचा समावेश होतो. झहीर खानकडे भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघाचा वेगवान मारा अधिकाधिक धारधार करण्याचे आव्हान झहीर खानसमोर असणार आहे.

आगामी विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. इंग्लिश वातावरणात वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळत असल्याने भारतीय गोलंदाजांना चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे. या पार्श्वभूमीवर झहीर खानची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाची तयारी करुन घेण्याची जबाबदारी झहीर खानकडे असणार आहे. झहीर खानच्या निवडीवरुन अनेकांनी बीसीसीआयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.