भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आल्यानंतर नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हार्दिक पंड्याचा मर्यादित षटकांच्या खेळात हातखंडा आहे, हे मान्य असले तरी कसोटी क्रिकेटसाठी पंड्याची निवड होईल असा अंदाज देखील नसताना त्याची निवड होणे, हे क्रिकेट रसिकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. नेटिझन्सने देखील हार्दिक पंड्याच्या निवडीवर आपले मत व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. हार्दिकची निवड हा सुखद धक्का असल्याची प्रतिक्रिया ट्विटरकरांनी दिली आहे. काहींनी हार्दिकच्या निवडचे स्वागत केले आहे, तर काहींनी त्याच्या निवडीचा निर्णय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पंड्याची कसोटी संघासाठी निवड होणे म्हणजे चेतेश्वर पुजाराला ट्वेन्टी-२० संघात स्थान देण्यासारखे आहे, असा टोला देखील एका नेटिझनने लगावला आहे.

हार्दिक पंड्याने नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पर्दापण करून दमदार कामगिरी केली. पंड्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच तीन विकेट्स घेऊन सामनावीराचा पुरस्कार पटकावला. हार्दिकच्या सध्याच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरच त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.