नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशने भारतावर मात केली. ३ सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश सध्या १-० ने आघाडीवर आहे. दिल्लीतलं वाढतं प्रदूषण आणि हवेची खालावलेली पातळी यामुळे गेले काही दिवस पहिल्या सामन्याचं ठिकाण बदलण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. मात्र विरोधानंतरही हा सामना अखेरीस पार पडलाच. या प्रदूषणाचा बांगलादेशी खेळाडूंनाही त्रास झाल्याची माहिती आता समोर येते आहे.

सौम्या सरकार आणि एका बांगलादेशी खेळाडूला पहिल्या सामन्यादरम्यान उलट्यांचा त्रास झाल्याची बातमी ESPNCricinfo संकेतस्थळाने दिली आहे. बांगलादेशी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनीही याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ७ तारखेला राजकोटच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश दुसऱ्या टी-२० सामन्यात भिडणार आहेत. या सामन्यावरही पावसाचं सावट असल्यामुळे सामना होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.