आयपीएल लिलावाला सुरुवात झाली तेव्हा पटियालामधील कुटुंबाला आपल्या दोन्ही मुलांना आठपैकी एक संघ नक्की विकत घेईल असा विश्वास होता. दोन्ही भावांना दोन वेगळवेगळ्या संघानी विकतदेखील घेतलं. पण जेव्हा विकेटकिपर आणि फलंदाज प्रभसिमरन सिंह याच्यावर संघांनी बोली लावण्यास सुरुवात केली तेव्हा कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अखेर 4.8 कोटींची बोली लावत किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रभसिमरनला आपल्या संघात घेतलं. तर त्याचा भाऊ अनमोलप्रीत सिंहला मुंबई इंडियन्सने 80 लाख रुपयांत खरेदी केलं आहे. अनमोल फलंदाज आहे. एका रात्रीत दोघा भावांचं नशीब फळफळलं आहे.

अनमोल आणि प्रभसिमरन दोघे चुलत भाऊ असून त्यांचं एकत्रित कुटुंब आहे. अनमोलचे वडिल सतविंदर सिंह हॅण्डबॉलचे खेळाडू असून ते राष्ट्रीय संघात खेळले आहेत. विशेष म्हणजे सतविंदर सिंह यांना क्रिकेट अजिबात आवडत नव्हतं. आपला मुलगा आणि पुतण्याने क्रिकेटर व्हावं अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. आपल्या मुलांनी हॅण्डबॉलमध्येच करिअर करावं अशी त्यांची इच्छा होती. पण दोघांनीही क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सतविंदर सिंह यांना आता मात्र आपल्या मुलांनी क्रिकेटची निवड केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

सतविंदर सिंह सांगतात की, ‘आमच्या घरामागील अंगणात दोन हॅण्डबॉल गोल पोस्ट आहेत. पण मुलांनी ते हटवून तिथे क्रिकेट नेट्स लावले. मला एक खेळ म्हणून क्रिकेट कधीच आवडत नव्हतं. पण नशिबाला वेगळंच हवं होतं. आता मी इतकंच म्हणू शकतो की आमच्या कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे’.

प्रभसिमरन याचं नाव येताच कुटुंबातील सगळ्यांनाच प्रचंड आनंद झाला होता. सर्वात आधी मुंबई इंडियन्सने डाव खेळला पण अखेर किंग्स इलेव्हन पंजाबने बाजी मारत त्याला आपल्या संघात घेतलं. जोपर्यंत लिलाव सुरु होता सर्व कुटुंबीय टीव्हीला चिकटून होते.

‘माझं आणि अनमोलला संधी मिळणार याची खात्री होती. पण माझ्यावर इतकी मोठी किंमत लावली जाईल याचा अजिबात अंदाज नव्हता’, अशी प्रतिक्रिया प्रभसिमरनने दिली आहे. अनमोलने सांगितलं आहे की, ‘आमच्या दोघांचं नाव येताच कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आम्ही आणि आमचे शेजारी आनंदाने वेडे झालो होतो. मध्यरात्रीपर्यंत आम्ही आनंद साजरा करत होतो. आम्ही मिठाई वाटली आणि नातेवाईकांसोबत भांगडा करत होतो’. छोटा भाऊ प्रभसिमरनला जास्त किंमत मिळाली आहे यावर प्रतिक्रिया विचारली असता यावर अनमोलने सांगितलं की, ‘याने काही फरक पडत नाही, आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत. शेवटी पैसे घरीच येत आहेत’.