भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिराती हे सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता ‘बीसीसीआय’समोर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसंदर्भातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा निर्णय आणि केंद्र सरकारची परवानगी ही दोन महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.  ‘आयपीएल’च्या हंगामाचे स्वरूप आणि कार्यक्रमपत्रिका या दोन आव्हानांवर मात केल्यानंतर निश्चित करण्यात येईल, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

‘बीसीसीआय’च्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी चार तास ऑनलाइन पद्धतीने चालली. यात ‘आयपीएल’, देशांतर्गत क्रिकेट हंगाम, राष्ट्रीय शिबिरासाठी ठिकाण, भारतीय क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय हंगाम यावर प्रामुख्याने चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी सोयिस्कर आणि करोनावर उत्तम नियंत्रण यामुळे ‘आयपीएल’च्या चालू वर्षांतील हंगामासाठी अमिरातीबाबत सर्वाचे एकमत झाले. आता ‘बीसीसीआय’ केंद्र सरकारशी याबाबत चर्चा करणार आहे. मात्र ‘आयसीसी’ने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच ‘आयपीएल’बाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत ठरवण्यात आले. ‘आयसीसी’च्या कार्यकारी समितीची बैठक सोमवारी होणार आहे. या बैठकीतच ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा निर्णय घेण्यात येईल.

देशांतर्गत क्रिकेट डिसेंबपर्यंत स्थगित?

देशांतर्गत क्रिकेट लवकरात लवकर सुरू करण्याबाबत बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. परंतु डिसेंबपर्यंत स्थानिक क्रिकेट सुरू करणे कठीण असल्याचे बैठकीत निष्पन्न झाले. चालू वर्षांअखेपर्यंत रणजी करंडक किंवा कोणत्याही वयोगटाच्या स्पर्धा सुरू करता येणार नाही. याचा मोठा फटका दुलीप करंडक, देवधर करंडक, चॅलेंजर्स मालिका आणि वयोगटांच्या स्पर्धाना बसणार आहे. याचप्रमाणे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चालू वर्षांत देशात आंतरराष्ट्रीय सामनेही खेळता येणार नाहीत.

खासगी विमाने आणि हॉटेलच्या निवडीसाठी ‘आयपीएल’ संघांची मोर्चेबांधणी

‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’साठी संयुक्त अरब अमिरातीची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी खासगी विमाने आणि हॉटेलच्या निवडीसाठी संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वाहतूक आणि सरावाच्या दृष्टीने सर्व संघांनी अबूधाबीला प्राधान्य दिले आहे. ‘‘अमिरातीला जाण्यापूर्वी देशातच विलगीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याची आमची योजना आहे. जैव-सुरक्षेची काळजी घेत करोना चाचणी केल्यावरच खेळाडूंना अमिरातीला पाठवण्यात येईल. त्यामुळे धोका कमी असेल. प्रत्येक संघाचे एकंदर ३५-४० सदस्य असल्याने खासगी विमानातून प्रवास करणे अधिक सोयिस्कर आहे. त्या दृष्टीने संघांनी तयारी सुरू केली आहे,’’ असे एका संघाच्या व्यवस्थापकीय सदस्याने सांगितले.