करोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे यंदाचा आयपीएल हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे. बीसीसीआयने मंगळवारी दुपारी याची अधिकृत घोषणा केली. आता या स्पर्धेतील विदेशी खेळाडू घरी जाण्याची वाट पाहत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघातील दोन खेळाडू सॅम बिलिंग्ज आणि ख्रिस वोक्स इंग्लंडमध्ये परतले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्राला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संपूर्ण दिल्ली संघाला क्वारंटाइनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले. पण त्याआधी इंग्लंडचे दोन खेळाडू मायदेशी रवाना झाले होते. त्यामध्ये सॅम बिलिंग्ज आणि ख्रिस वोक्स यांचा समावेश होता. ब्रिटिश सरकारच्या परवानगीने त्यांना घरी जाणे शक्य झाले. परंतु इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना १० दिवस वेगळे राहणे भाग आहे.

या आयपीएलमध्ये या दोन खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर खेळाडूंनीही भाग घेतला. त्यात ईऑन मॉर्गन, मोईन अली, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, जॉनी बेअरस्टो, ख्रिस जॉर्डन, जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू पुढील चार दिवसांत इंग्लंडलाही परततील. तथापि, जाण्यापूर्वी, त्यांना एक निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल.

परदेशी खेळाडूंच्या परतीचा प्रश्न कायम

‘आयपीएल’चे १४वे पर्व स्थगित करावे लागल्यानंतर परदेशी क्रिकेटपटूंच्या मायदेशी परतण्याचा प्रश्न जटिल बनला आहे. ऑस्ट्रेलियात १५ मेपर्यंत टाळेबंदी असून तोपर्यंत त्यांच्या खेळाडूंना भारतातच मुक्काम करावा लागणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे १४, न्यूझीलंडचे १०, इंग्लंडचे ११, दक्षिण आफ्रिकेचे ११, वेस्ट इंडिजचे नऊ तसेच अफगाणिस्तानचे तीन आणि बांगलादेशचे दोन क्रिकेटपटू आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करत होते.