04 July 2020

News Flash

दोन पिढय़ांचे स्वप्न प्रणवकडून साकार

सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणाऱ्या सामान्य कुटुंबातील प्रणव धनावडेची असामान्य कथा.

विक्रमी खेळीनंतर आईवडिलांसह प्रणव. छायाचित्र : दीपक जोशी 

 

वडील रिक्षाचालक, आईचा केटरिंगचा व्यवसाय, परिस्थितीशी झुंज देत वाटचाल

दैनंदिन जीवनात सामान्य कुटुंबाच्या वाटय़ाला येणारी धावपळ त्यांच्याही वाटेला होतीच.. त्यामुळे स्वप्न पाहणे आणि ते अस्तित्वात उतरवणे हे दूरच राहिले, पण त्यासाठी सवड काढणेही कठीण.. मात्र आर्थिक परिस्थितीच्या बेडय़ांनी आपल्याला जखडले म्हणून मुलानेही त्याची विवंचना सोसावी, हे त्यांना मान्य नव्हते.. म्हणून पोटाला चिमटा काढून आणि रात्रीचा दिवस करून त्यांनी मुलाला स्वप्न दाखवले आणि ते प्रत्यक्षात उतरवलेही.. सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणाऱ्या सामान्य कुटुंबातील प्रणव धनावडेची असामान्य कथा.

आर्थिक परिस्थितीमुळे आजोबा आणि वडील यांच्या क्रिकेटपटू होण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरले होते. परंतु  प्रणवने ते स्वप्न पूर्ण करावे अशी वडील प्रशांत यांची इच्छा होती. मंगळवारी प्रणवने नाबाद १००९ धावांची खेळी साकारून वडिलांच्या इच्छापूर्तीच्या दिशेने पाऊल टाकले. पहिल्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीने भारावलेले प्रणवचे वडील दुसऱ्या दिवशी मैदानावर सुरुवातीपासून हजर होते. प्रणवच्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद घेण्यात प्रशांत रमले होते.

हे सर्व जवळून पाहणारी प्रणवची आई मोहिनी सांगतात़, ‘‘आज प्रणवने ही ऐतिहासिक कामगिरी करून आमच्या मेहनतीचे चीज केले. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. खूप आनंदाचा क्षण आहे. पहिलीत असल्यापासून तो क्रिकेटचे धडे गिरवत होता. वडिलांना व आजोबांना क्रिकेटची आवड होती, परंतु परिस्थितीमुळे त्यांना स्वप्न साकार करता आले नाही. पण प्रणवच्या बाबतीत हे होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे आपले हे अधुरे स्वप्न प्रणवने पूर्ण करावे ही वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रणवला पाठिंबा दिला. पहिलीत असताना ते त्याला क्रिकेट प्रशिक्षणासाठी मैदानावर घेऊन गेले. प्रणवनेही आपल्यातील कौशल्य दाखवत यश मिळवले.’’

हे स्वप्न साकारणे तितकेसे सोपे नव्हते. आर्थिक चणचण धनावडे कुटुंबीयांना होतीच. त्यामुळे प्रणवची आवड जोपासण्यासाठी त्यांनाही तडजोड करावी लागली.

गृहोपयोगी वस्तूंना दुय्यम प्राधान्य देऊन प्रणवला क्रिकेट उपयोगी वस्तू घेऊन देणे याला त्यांनी प्राधान्य दिले. ‘‘बॅट, ग्लोव्ह्ज, पॅड तशा महाग वस्तू. पण त्याला आम्ही प्राधान्य दिले. अनेकदा आम्ही गृहोपयोगी

वस्तू घेणे टाळले,’’ असे प्रणवची आई सांगते.

अनेक यशोशिखरे पादाक्रांत कर, पण..

प्रणवने कारकिर्दीत पुढे काय करायचे, याचा निर्णय स्वत: घ्यावा. त्याचे निर्णय घेण्यास तो समर्थ आहे. आमचा सदैव त्याला पाठिंबा असेल. पण, या एका यशाने  न भरकटता त्याने यशाची अनेक शिखर पादाक्रांत करावी. ही शिखरे सर करताना त्याचे पाय नेहमी जमिनीवर असावेत. यशाची ही हवा डोक्यात जावू देऊ नकोस, असा सल्ला आईने दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 5:41 am

Web Title: two generation dream come true by pranav dhanawade
Next Stories
1 हशीम अमलाचे द्विशतक, दक्षिण आफ्रिकेचे दमदार प्रत्युत्तर
2 ऑस्ट्रेलियाची १९ वर्षांखालील विश्वचषकातून माघार
3 चंडिला व शहा यांच्याबाबत अठरा जानेवारीला निर्णय
Just Now!
X