भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना हटविण्याच्या मोहिमेला स्नूकर व बिलियर्ड्स तसेच वुशु खेळाच्या राष्ट्रीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. रामचंद्रन यांच्याविरोधी मोहिमेत आतापर्यंत सोळा संघटना सहभागी झाल्या आहेत. 

आयओएची विशेष सर्वसाधारण सभा लवकरच आयोजित करण्याची व तेथे रामचंद्रन यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी या सोळा संघटनांनी आयओएला पत्र लिहिले आहे. आयओएशी संलग्न असलेल्या ३५ राज्यांच्या संघटनांपैकी चौदा संघटनांनी अविश्वासाच्या ठरावाची मागणी केली आहे. त्यामध्ये बंगाल, बिहार, चंडीगढ, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.
आयओएच्या नियमावलीनुसार अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. या सभेस कमीत कमी तीन चतुर्थाश सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. आयओएकडे एकूण १८३ सदस्यांची मते आहेत. विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचा अधिकार आयओएचे अध्यक्ष किंवा कार्यकारिणी समिती यांना आहे, तसेचसंलग्न सदस्यांपैकी निम्म्याहून अधिक सदस्य केवळ एक महिन्याच्या नोटिसीद्वारे ही सभा घेऊ शकतात. रामचंद्रन यांनी केवळ चौदा महिन्यांपूर्वीच आयओएच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र अन्य पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ते एकतर्फी निर्णय घेतात, असा आरोप त्यांच्या विरोधी गटातील संघटकांनी केला आहे.