‘‘विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे सध्याचे स्वरूप चांगले असून पुढच्या स्पर्धेतील पहिल्या दोन फे ऱ्यांमध्ये आणखी दोन संघांचा समावेश करण्याची शक्यता आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले.
‘‘विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने खूप चांगल्या पद्धतीने झाले. सहभागी संघांना समान स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी हा आमचा हेतू सफल झाला आहे. कदाचित एक किंवा दोन संघांचा समावेश करीत आम्ही स्पर्धेचे स्वरूप वाढविण्याचा विचार करू किंवा पहिल्या फेरीतील प्रत्येक गटात आणखी एका संघाचाही समावेश केला जाण्याचा विचार करीत आहोत. त्यामुळे जरी एखाद्या संघाने दोन सामने गमावले तरीही पुढच्या फेरीत जाण्याची संधी कायम राहील व सामने अधिक रंगतदार होतील. अव्वल साखळी गटात १० संघांऐवजी १२ संघांनाही स्थान देण्याचा विचार आहे. मात्र त्यामुळे सामन्यांची संख्या वाढेल,’’ असे रिचर्डसन यांनी सांगितले.