विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत ‘अतिरिक्त संघसदस्य’ बाळगणे महागात
आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघासोबत ‘अतिरिक्त संघसदस्य’ बाळगल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दोन कोटी ४० लाख रुपयांचा भुर्दंडसोसावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये वर्षांच्या पूर्वार्धात झालेल्या विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) भारताला हे पैसे भरावे लागणार आहेत.
आयसीसीच्या नियमानुसार विश्वचषकाच्या प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश होता. संघव्यवस्थापनाचा भाग म्हणून भारताने कुलकर्णीला संघासोबतच ठेवले होते. मात्र या सदस्यानिमित्ताने आयसीसीकडे तीन लाख ७० हजार १११.९६ डॉलर म्हणजेच दोन कोटी ४३ लाख ५० हजार ३६ रुपये (दर – एक डॉलर : ६५.७९१ रुपये) भरावे लागणार आहेत.
बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर हे नमूद करण्यात आले आहे. मागील महिन्यात बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांनी २५ लाखांहून अधिक कोणताही खर्च वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल, असे म्हटले होते.
याचप्रमाणे चालू वर्षांत झालेल्या आयपीएल हंगामासाठी लाचलुचपतविरोधी विभागाची सेवा घेतल्याबद्दल तीन लाख ८० हजार डॉलर म्हणजेच दोन कोटी ४९ लाख ५६ हजार ५०० रुपये आयसीसीकडे भरावे लागणार आहेत.