कर्नाटक प्रीमियर लीगदरम्यान पैसे घेऊन निकालनिश्चिती केल्याप्रकरणी कर्नाटकचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सी. एम. गौतम आणि माजी खेळाडू अबरार काझी यांना अटक करण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये तीन सामने खेळणारा तसेच बेलारी टस्कर्स संघाचा कर्णधार गौतम याच्यासह काझीला गुरुवारी कर्नाटकच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. हे पथक गेल्या दोन मोसमांत कर्नाटक प्रीमियर लीगमधील (केपीएल) निकालनिश्चितीची चौकशी करत आहे.

‘‘केपीएलमध्ये निकालनिश्चिती केल्याप्रकरणी आम्ही दोन खेळाडूंना अटक केली आहे. चौकशी संपल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंना अटक होण्याची शक्यता आहे,’’ असे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले.

गौतम हा सध्या गोव्याचे तर काझी मिझोरामचे प्रतिनिधित्व करत आहे. दोघांचाही शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी आपापल्या संघात समावेश करण्यात आला आहे. ‘‘बेलारी टस्कर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात २०१९ मोसमाच्या अंतिम फेरीत धिम्या गतीने फलंदाजी करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच घेण्यात आली होती. हुबळी टायगर्सने हा सामना आठ धावांनी जिंकला होता. बेंगळूरु संघाविरुद्धचाही एक सामना निश्चित करण्यात आला होता,’’ असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सामनानिश्चितीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर बेळगावी पँथर्स संघाच्या मालकांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. गौतम आणि काझी हे देशांतर्गत तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळत आहेत. ३३ वर्षीय गौतमने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ३० वर्षीय काझी २०११ मध्ये बेंगळूरु संघाकडून खेळला होता.