इंग्लंडविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेला सुरुवात होण्याआधीच यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. सलग दुसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आतापर्यंत दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिका होणार का याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी खेळाडूला करोनाची लागण झाल्याचं समोर येताच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने खबरदारी घेत संघाच्या क्वारंटाईन सुविधेत बदल केले आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने करोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नाव जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या केप टाऊनमधील एका हॉटेलमध्ये दोन्ही संघ एकत्र राहत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने दोन्ही संघातील खेळाडूंना दुसऱ्या स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून दोन्ही देशांतील मालिकेला सुरुवात होणार आहे.