पैशांच्या मोहापायी मॅच-फिक्सिंग करणाऱ्या श्रीलंकेच्या सगारा गॅलेस आणि मॉरीस डी ला झिल्वा या दोन्ही पंचांना ‘टीव्ही स्टिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून पकडण्यात आले आहे. गॅलेज यांनी दहा तर झिल्वा यांच्यावर तीन वर्षांचे निलंबन करण्याचा निर्णय श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने (एसएलसी) घेतला आहे. तर गामिनी देसानायके यांच्याविरोधात ठोस पुरावे न सापडल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये एका भारतीय वृत्तवाहिनीने श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशचे सहा पंच खेळाडूंना सामना निश्चित करण्यासाठी मदत करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. श्रीलंका प्रीमिअर लीगच्या सामन्यांमध्ये या पंचांनी खेळाडूंना मदत केल्याचे दाखवण्यात आले होते. श्रीलंकेच्या तीन पंचांबरोबर यामध्ये पाकिस्तानच्या नदीम घौरी आणि अनीस सिद्धिकी यांचा समावेश आहे, तर बांगलादेशच्या नदीर शाह यांचाही या मॅच फिक्सिंगमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले होते.