महाराष्ट्राच्या वेदांत बापना आणि युगा बिरनाळे या दोन जलतरणपटूंनी खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याखेरीज महाराष्ट्राच्या अनया वाला, ऋतुजा तळेगावकर, साहिल गनगोटे यांनी ब्राँझपदकाची कमाई केली.  मुंबईचा १५ वर्षीय खेळाडू वेदांत याने मुलांच्या १७ वर्षाखालील गटात १०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यत एक मिनिट ०.१६ सेकंदात जिंकली. वेदांत याने याआधी भारतीय जलतरण महासंघाच्या फेडरेशन चषक स्पर्धा, कुमार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरपूर पदकांची लयलूट केली आहे. तो ग्लेनमार्क फाउंडेशन अकादमीत सराव करीत असून बॉम्बे स्कॉटिश प्रशालेत शिकत आहे.

पुण्याच्या युगा बिरनाळेची सुवर्णभरारी जलतरण सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या युगा हिने अपेक्षेप्रमाणे २१ वषार्खालील गटाच्या १०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीचे विजेतेपद  पटकाविले. तिने ही शर्यत एक मिनिट ०८.४६ सेकंदात जिंकली. पुण्यात बीएमसीसीमध्ये शिकणाऱ्या युगाने हार्मनी क्लब येथे भूपेन आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिने यापूर्वी अखिल भारतीय आंतर विद्याापीठ स्पर्धांमध्ये पाच सुवर्ण व तीन ब्राँझपदके मिळविली होती. तसेच फेडरेशन चषक स्पर्धेत तिला दोन सुवर्ण आणि एक ब्राँझ अशी तीन पदके मिळाली होती. १९ वर्षीय खेळाडू युगा हिने सांगितले, येथे विजेतेपद मिळविण्याची खात्री होती. तथापि येथे चिवट झुंज द्याावी लागली. शेवटच्या टप्प्यात मी वेग वाढविल्यामुळेच मला सुवर्णपदक मिळविता आले.

मुलींच्या १७ वषार्खालील गटात अनया वाला या मुंबईच्या खेळाडूला चारशे मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला दिल्लीची प्राची टोकस (४ मिनिटे ३७.९९ सेकंद) व कर्नाटकची खुशी दिनेश (४ मिनिटे ३८.०९ सेकंद) यांनी तिला मागे टाकले आणि अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले. अनया हिने हे अंतर ४ मिनिटे ४३.७५ सेकंदात पार केले.

२१ वषार्खालील मुलींच्या चारशे मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत ऋतुजा तळेगावकर (४ मिनिटे ५०.८४ सेकंद)हिला ब्राँझपदक मिळाले. तिला कर्नाटकची भाविका दुगर (४ मिनिटे ४१.४३ सेकंद) व हरयाणाची जस्मीन गुरंग (४ मिनिटे ४५.२२ सेकंद) यांनी मागे टाकून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले. ऋतुजा ही मूळची नागपूरची खेळाडू असून ती पुण्यात जितेंद्र खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असते.

मुलांच्या १७ वषार्खालील गटात साहिल गनगोटे या महाराष्ट्राच्या खेळाडूने चारशे मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यतीत ब्राँझपदक मिळविले. त्याने हे अंतर चार मिनिटे ५९.२० सेकंदात पूर्ण केले. दिल्लीचा स्वदेश मोंडल (४ मिनिटे ४७.१३ सेकंद) व गोव्याचा शोन गांगुली (४ मिनिटे ५१.६५ सेकंद) हे अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाचे मानकरी ठरले.