महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध पाकिस्तान या संघात अँटिगामध्ये दुसरा टी २० सामना खेळला गेला. या सामन्यात दोन महिला खेळाडू मैदानात चक्कर येऊन पडल्या. वेस्टइंडिजच्या दोन्ही महिला खेळाडू १० मिनिटाच्या अंतराने एका पाठोपाठ एक चक्कर येऊन पडल्या. यानंतर त्या दोघींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या दोघींची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र कारण अद्याप अस्पष्ट आहे. उकाड्यामुळे त्यांना चक्कर आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

वेस्ट इंडिज महिला संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी ६ गडी गमवत १२५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. संघाचं चौथं षटक सुरु असताना क्षेत्ररक्षण करणारी चिनेले हेनरी चक्कर येऊन पडली. त्यानंतर सर्व खेळाडूंनी तिच्याकडे धाव घेत वैद्यकीय मदत मागितली आणि तिला मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर १० मिनिटांनी चेडियन नेशनही चक्कर येऊन मैदानात कोसळली. त्यामुळे काही काळ चिंतेचं वातावरण पसरलं होतं. दोन्ही खेळाडूंना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

वेस्टइंडिजने दोन राखीव खेळाडूंना मैदानात उतरवत पुन्हा खेळाला सुरुवात केली. मात्र पावसामुळे सामन्याचा खोळंबा झाला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तान संघासमोर १८ षटकात १११ धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं. पाकिस्तानने १८ षटकात ६ गडी गमवून १०३ धावा केल्या. पाकिस्तानचा ७ धावांनी पराभव झाला.