भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी पुरुष क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षकासह अन्य साहाय्यक मार्गदर्शकांसाठी अर्ज मागवले आहेत. मुख्य प्रशिक्षकासाठी दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आणि ६० वर्षे वयाचे बंधन घालण्यात आले आहे.

‘बीसीसीआय’ने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजीचा प्रशिक्षक, गोलंदाजीचा प्रशिक्षक, क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, क्षमता आणि वातावरणासंदर्भातील मार्गदर्शक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ३० जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे.

जुलै २०१७मध्ये रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेण्यापूर्वी ‘बीसीसीआय’ने नऊ मुद्दय़ांचा समावेश असलेले पात्रता निकष स्पष्ट केले होते. मात्र यात स्पष्टता नव्हती. या वेळी प्रशिक्षकांच्या पदांसाठी फक्त तीन मुद्दय़ांचे पात्रता निकष आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार असून, १५ सप्टेंबरपासून त्यांच्याविरुद्धच्या मालिकेला प्रारंभ होईल. याच दौऱ्यापासून नियुक्ती प्रक्रियेतील मार्गदर्शक कार्यरत होतील. अनिल कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वादग्रस्त पद्धतीने संपुष्टात आल्यानंतर २०१७मध्ये रवी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ‘आयसीसी’ची कोणतीही स्पर्धा जिंकली नाही. परंतु ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली होती.

४५ दिवसांची मुदतवाढ

सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांना विश्वचषकानंतर ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कारण भारतीय संघ ३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाच्या सध्याच्या मार्गदर्शकांना नियुक्ती प्रक्रियेत पुन्हा अर्ज करावा लागेल, असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे. मात्र भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर सराव मार्गदर्शक शंकर बसू आणि फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी राजीनामा दिला आहे.

पात्रता निकष

मुख्य प्रशिक्षक

* किमान दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा अनुभव असावा.  किंवा संलग्न राष्ट्राचा संघ, राष्ट्रीय ‘अ’ संघ, इंडियन प्रीमियर लीगचा संघ यांचा तीन वर्षांचा अनुभव असावा.

* अर्जदाराने ३० कसोटी किंवा ५० एकदिवसीय सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. किंवा ‘बीसीसीआय’चा तिसऱ्या स्तरावरील प्रशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

* उमेदवार ६० वर्षांखालील असावा.

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (प्रत्येकी एक जागा)

* किमान दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा अनुभव असावा.  किंवा संलग्न राष्ट्राचा संघ, राष्ट्रीय ‘अ’ संघ, इंडियन प्रीमियर लीगचा संघ यांचा तीन वर्षांचा अनुभव असावा.

* अर्जदाराने १० कसोटी किंवा २५ एकदिवसीय सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. किंवा ‘बीसीसीआय’चा तिसऱ्या स्तरावरील प्रशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

* उमेदवार ६० वर्षांखालील असावा.