कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेत दणदणीत विजय साजरा केल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या ‘मिशन टी-२०’ ला सुरूवात करणार आहे. तीन सामन्याच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरूवारी कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहली याने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले. कोहलीने यावेळी विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात ज्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अश्विन आणि जडेजाला आराम देण्यात आला असला तरी परवेज रसूल, अमित मिश्रा हे दोघंही तोडीस तोड आहेत. यजुवेंद्र चहलची कामगिरी देखील आपण सर्वांनी याआधी पाहिली आहे. परवेज रसूल आयपीएलमध्ये माझ्याच नेतृत्त्वाखाली बंगळुरू संघाकडून खेळला आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजी मी अगदी जवळून पाहिलेली आहे. तो आत्मविश्वासाने खेळणारा खेळाडू आहे आणि आम्हाला अशाच खेळाडूंची ट्वेन्टी-२० च्या आव्हानासाठी गरज आहे. तो नव्या चेंडूवरही जगातील कोणत्याही घातक फलंदाजासमोर चांगली गोलंदाजी करू शकतो, असे कोहलीने सांगितले.

 

इंग्लंडच्या ताफ्यात वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळख असलेला ट्यामल मिल्स याचा समावेश करण्यात आला आहे. मिल्सच्या वेगवान गोलंदाजीच्या आव्हानाबाबत विचारले असता विराट म्हणाला की, प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज किती दर्जेदार आहे. याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. मी याआधी याच्यापेक्षाही अधिक वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे मिल्सच्या गोलंदाजीचे माझ्यासह संघातील इतर कोणत्याच फलंदाजावर कोणताही दबाव नसेल.

सुरेश रैनाच्या ट्वेन्टी-२० संघातील पुनरागमनावर बोलताना विराटने रैनाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. रैना गेल्या बऱयाचा काळापासून क्रिकेटपासून दूर असला तरी ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये कशी फलंदाजी करावी याचा त्याला चांगला अनुभव आहे. तो ट्वेन्टी-२० च्या धाडणीचा उत्कृष्ट खेळाडू आहे, असे कोहलीने सांगितले.

दरम्यान, भारतीय संघाच्या निवड समितीने बांगलादेश विरुद्धची एक कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेचा विचार करून अश्विन आणि जडेजा या दोघांना इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आराम दिला आहे. भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून कोहलीची चांगली सुरूवात झाली आहे. यापाठोपाठ कोहली आता ट्वेन्टी-२० मध्येही विजयरथ कायम राखणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.