१९ वर्षाखालील विश्वचषक जिंकण्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेला भारतीय संघ पहिल्या सराव परीक्षेत पास झाला आहे. मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १८९ धावांनी मात केली. १३ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सावध सुरुवात केलेल्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२२ धावांचं आव्हान उभं केलं. भारताने दिलेलं आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पेलवलं नाही. अखेर भारताने या सामन्यात १८९ धावांनी विजय संपादन केला.

गोलंदाजीत बंगालचा जलदगती गोलंदाज इशान पोरेलने २४ धावांमध्ये ४ फलंदाजांना माघारी धाडलं. भारताकडून फलंदाजीत हिमांशू राणा आणि आर्यन जुयाल यांनी शतकी भागीदारी करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. अखेरच्या फळीत अभिषेक शर्मा, अनुकूल रॉय आणि कमलेश नागरकोटीने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. या विजयामुळे मुख्य स्पर्धेत भारत कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.