मनजोत कालराने अंतिम सामन्यात केलेलं शतक आणि त्याला इतर भारतीय फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात करत भारताने चौथ्यांदा १९ वर्षाखालील चषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात विजयासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाने २१७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं हे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात लिलया पार केलं. भारतीय डावाचा हिरो ठरला तो सलामीवीर डावखुरा फलंदाज मनजोत कालरा. कालराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लोबोल करत शतक झळकावलं. त्याला हार्विक देसाई, शुभमन गिल आणि कर्णधार पृथ्वी शॉ या खेळाडूंनीही तितकीच मोलाची साथ दिली. भारताच्या एकाही फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून रोखणं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जमलं नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला मात्र भारतीय गोलंदाजांनी चांगलचं सतावलं. जोनाथन मेरलोचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय आक्रमणाचा सामना करु शकला नाही. इशान पोरेल, शिवा सिंह, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखण्यात मोठा वाटा उचलला. याचसोबत भारतीय क्षेत्ररक्षकांनी तितक्याच चपळाईने क्षेत्ररक्षण करत गोलंदाजांच्या प्रयत्नांना दाद दिली. संपूर्ण स्पर्धेत धावांचा रतिब घालणाऱ्या शुभमन गिलला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने संघातील प्रत्येक खेळाडूला ३० लाख, प्रशिक्षक राहुल द्रविड  यांना ५० लाख तर सपोर्ट स्टाफला २० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

  • अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात करत भारत U-19 विश्वचषकाचा विजेता
  • विजयाची औपचारिकता मनजोत कालरा आणि हार्विक देसाईकडून पूर्ण
  • विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना मनजोत कालराचं शतक
  • भारताला दुसरा धक्का, शुभमन गिल माघारी
  • मनजोत कालराचं शतकं, भारताची सामन्यावर मजबूत पकड
  • भारताने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
  • भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ माघारी, सदरलँडने उडवला त्रिफळा
  • पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ७१ धावांची भागीदारी
  • भारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा, पृथ्वी शॉ-मनजोत कालराची आक्रमक सुरुवात
  • पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात
  • सामन्यात पावसाची हजेरी, पंचांनी खेळ थांबवला
  • भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • भारतासमोर विजयासाठी २१७ धावांचं आव्हान, भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा
  • ऑस्ट्रेलियाचा अखेरचा फलंदाज माघारी, रायन हेडली हार्विक देसाईकडे झेल देत बाद
  • ऑस्ट्रेलियाला नववा धक्का, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाक्स्टर हॉल्ट धावचीत
  • कमलेश नागरकोटीचा ऑस्ट्रेलियाला आठवा दणका, झॅक इव्हान्स त्रिफळाचीत
  • ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी
  • अनुकूल रॉयच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या नादात मेरलो माघारी
  • अखेर जोनाथन मेरलोचा अडसर दूर करण्यात भारताला यश
  • ऑस्ट्रेलियाचे ६ गडी तंबूत परतले, एका बाजूने जोनाथन मेरलोची झुंज सुरुच
  • ठराविक अंतराने नॅथन मॅकस्वेनी आणि विल सदरलँड माघारी
  • शिवा सिंहचे ऑस्ट्रेलियाला दुहेरी दणके
  • जोनाथन मेरलोचं संयमी अर्धशतक, ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला
  • ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी माघारी
  • अनुकूल रॉयने ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडली, उप्पल माघारी
  • जोनाथन मेरलो आणि परम उप्पलकडून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • ऑस्ट्रेलियाने ओलांडला शंभर धावसंख्येचा टप्पा
  • २० षटकांच्या आत ऑस्ट्रेलियाचे ३ गडी माघारी
  • मात्र कमलेश नागरकोटीच्या गोलंदाजीवर देसाईकडे झेल देत संघा माघारी
  • कर्णधार जेसन संघाकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • ठराविक अंतराने जॅक एडवर्ड माघारी, ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
  • इशान पोरेलच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माकडे झेल देत ब्रायंट माघारी
  • मात्र मॅक्स ब्रायंटला बाद करत भारताने ऑस्ट्रेलियाची पहिली जोडी फोडली
  • ऑस्ट्रेलियन सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय