जगभरात क्रिकेटप्रेमी ज्या सामन्याची वाट पाहत असतात तो सामना अखेरीस, निश्चीत झालेला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तानने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानवर ६ गडी राखून मात करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. ४ फेब्रुवारी रोजी हा सामना रंगणार आहे.

अफगाणिस्तानचा १८९ धावांवर बाद केल्यानंतर, विजयासाठीचं १९० धावांचं लक्ष्य पाकिस्तानने सहज पार केलं. मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामना हा भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. २०१८ साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानवर मात करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलेलं होतं. भारतीय संघाने त्यावेळी २०३ धावांनी सामना जिंकला होता. भारतीय संघाने ५० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या…प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ केवळ ६९ धावांवर गारद झाला होता.

दरम्यान पाकिस्तानविरुद्ध सामन्यात पाकचा सलामीवीर मोहम्मद हुराने ७६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही संघ या स्पर्धेत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीतपर्यंत येऊन पोहचलेले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.