दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला सामना खेळायला सुरुवात केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात मुंबईच्या यशस्वी जैस्वालने आश्वासक खेळी करत महत्वाचा टप्पा सर केला आहे.

दिव्यांश सक्सेनाच्या साथीने यशस्वी जैस्वालने भारतीय संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. यादरम्यान यशस्वीने युवा क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. सर्वात जलद हा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये यशस्वी जैस्वालने स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत यशस्वीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.