डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत हॅट्ट्रिक साकारणारा कुलदीप हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्यामुळेच भारताने अ-गटातील सामन्यात स्कॉटलंडला फक्त ८८ धावांत गुंडाळले व त्यानंतर पाच विकेट राखून विजयाची नोंद केली. कुलदीपने २८ धावांत ४ बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावला.
स्कॉटलंडच्या तुटपुंज्या आव्हानापुढे भारताचीही त्रेधातिरपीट उडाली होती. ७.५ षटकांत फक्त २२ धावांत भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. परंतु सर्फराझ खान आणि दीपक हुडा यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ धावांची महत्त्वपूर्ण आणि नाबाद भागीदारी रचून २२.३ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सर्फराझने ५१ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४५ धावा केल्या, तर हुडाने त्याला साथ देताना ४० चेंडूंत २ चौकारांसह २४ धावा केल्या.
तसेच नवख्या अफगाणिस्तानने बलाढय़ ऑस्ट्रेलियावर मात करत सनसनाटी विजय मिळवला.