25 February 2021

News Flash

U-19 World Cup Final : भारताच्या युवाशक्तीचे पाचव्या जेतेपदाचे लक्ष्य

भारताच्या बांगलादेशबरोबर उद्या अंतिम सामना

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

गतविजेता भारतीय संघ युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा मोहोर उमटवण्यासाठी उत्सुक आहे. रविवारी होणाऱ्या आशियाई स्पर्धकांमधील अंतिम सामन्यात प्रथमच इथवर झेप घेणाऱ्या बांगलादेशकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे.

२०१८च्या युवा विश्वविजेत्या भारतीय संघातील पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांच्याकडे आता वरिष्ठ संघात आशेने पाहिले जात आहे. सध्याच्या युवा संघातील सलामीवीर यशस्वी जैस्वाल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांनी भारताला अंतिम फेरीपर्यंत नेले आहे. याच उदयोन्मुख ताऱ्यांची आता क्रिकेटक्षेत्रात चर्चा केली जात आहे.

रविवारच्या अंतिम सामन्यात निकाल कोणताही लागो, परंतु भारताचे १९ वर्षांखालील क्रिकेटमधील निर्विवाद वर्चस्व कुणीच नाकारू शकणार नाही. कारण याआधीच्या १३ युवा विश्वचषकांपैकी सर्वाधिक चार वेळा भारताने विजेतेपद, तर दोनदा उपविजेतेपद आणि दोनदा तिसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे वयोगटांच्या क्रिकेटमधील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) आराखडा अन्य देशांपेक्षा प्रभावी असल्याचेच यातून सिद्ध झाले आहे.

२०१८च्या युवा विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडमधील तिरंगी क्रिकेट स्पर्धा आणि गतवर्षीचा युवा आशिया चषक या स्पर्धामध्ये बांगलादेशपेक्षा सरस कामगिरी केली आहे.

पृथ्वी आणि गिलप्रमाणे सर्वाचेच वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न साकारत नाही. २०१५मधील युवा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदकडून मोठय़ा अपेक्षा केल्या जात होत्या. परंतु त्याची कामगिरी कालांतराने ढासळत गेली. दिल्ली संघातून उत्तराखंडकडे स्थलांतरित झाल्यानंतरही त्याचे नशीब पालटले नाही. रणजी संघात अंतिम ११ खेळाडूंमध्येही त्याला स्थान मिळवणे कठीण जाते.

यंदाच्या युवा विश्वचषकात भारताने अ-गटात तीनपैकी तीन सामने जिंकत ६ गुणांसह गटविजेतेपद मिळवून बाद फेरी गाठली. मग उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव केला, तर मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १० गडी राखून नमवले.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 10:20 pm

Web Title: u 19 world cup final indias final match with bangladesh today
Next Stories
1 U-19 World Cup Final : यशस्वी जैस्वाल ठरु शकतो बांगलादेशसाठी डोकेदुखी
2 U-19 World Cup Final : महामुकाबल्याची रणनिती, जाणून घ्या काय करत होती टीम इंडिया
3 FIH Pro Hockey League : चक दे इंडिया ! बलाढ्य बेल्जियमवर भारताची २-१ ने मात
Just Now!
X