दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर तर न्यूझीलंडने बांगलादेशवर मात केली. या स्पर्धेत भारताकडून यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना, रवी बिश्नोई, कार्तिक त्यागी हे खेळाडू चमकले आहेत. या सर्वांमध्ये मुंबईचा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने आपली विशेष छाप पाडली आहे. मोक्याच्या क्षणी टिच्चून मारा करत प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला वेसण घालण्याचं काम अथर्वने केलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतली त्याची कामगिरी ही वाखणण्याजोगी होती. अंतिम फेरीतही अथर्व आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचं स्वप्न बाळगून आहे. विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा डोळ्यासमोर असतानाही अथर्वच्या मनात आईचा विचार कायम आहे.

अथर्वची आई मुंबईत BEST मध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. अथर्व दहा वर्षांचा असताना त्याचे वडील वारले, यानंतर त्याच्या आईनेच आपल्या दोन्ही मुलांना सांभाळून मोठं केलंय. आईने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव अथर्वला आजही आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीच्या लिलावात अथर्वने आपलं नाव दिलेलं होतं. २० लाख ही त्याची मुळ किंमत ठरलेली होती, संघात निवड झाल्यास आईने धकाधकीचं काम सोडून द्यावं अशी अथर्वची इच्छा होती. परंतू तांत्रिक कारणामुळे अथर्वचं नाव लिलावाच्या यादीतून वगळलं गेलं. पण अथर्वने अजुनही हार मानलेली नाही. विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करुन तो आपल्या आईचे कष्ट कसे कमी होतील याचा विचार करत असतो.

“विश्वचषक स्पर्धा ही अथर्वसाठी निर्णयाक ठरु शकतो. हा सामना भारत जिंकला तर त्याला भविष्यात चांगल्या संधी मिळत जातील. आयपीएलमध्ये त्याचं नाव आलं नाही म्हणून तो यंदा थोडासा नाराज झाला होता. पण आयपीएल प्रत्येक वर्षी येणार आहे, विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी ही एकदाच मिळते.” वैदेही अंकोलेकर हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. माझ्या कामाचं स्वरुप खूप धकाधकीचं आहे, त्यामुळे मी नोकरी सोडावी अशी त्याची इच्छा आहे. मात्र तो क्रिकेटमध्ये स्थिरसावर होईपर्यंत मी हा विचार करु शकणार नाही. अथर्वचा भाऊही क्रिकेट खेळतो, त्याचाही विचार मला करायचा आहे. जोपर्यंत अथर्व क्रिकेटमध्ये स्थिरसावर होत नाही तोपर्यंत मी नोकरी सोडायचा विचार करु शकत नाही, वैदेही अंकोलेकरांचा आपल्या मुलाच्या कामगिरीबद्दल बोलत होत्या.

BEST मधील आपल्या व्यस्त कामकाजामुळे वैदेही यांना अनेकदा अथर्वचे सामने पाहता आलेले नाहीत. मरोळ आगार ते वैशाली नगर ही ३०७ क्रमांकाची बस वैदेही यांच्या कामाचं ठिकाण आहे. मात्र रविवारच्या अंतिम सामन्यासाठी वैदेही यांनी सर्व कामांमधून सुट्टी घेऊन फक्त टीव्हीसमोर बसण्याचा विचार पक्का केला आहे. भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहचवण्यामध्ये अथर्वचा मोठा वाटा आहे, त्यामुळे अंतिम फेरीत आपला मुलगा चमकावा अशी आशा वैदेही यांना आहे.