अनुप कुमार, मोहित चिल्लर, सुरेंदर नाडा आणि विशाल माने या प्रमुख चार खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या यू मुंबाने अखेरच्या चढाईपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत बंगळुरू बुल्सवर २९-२८ अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीगमध्ये नेत्रदीपक विजयाची नोंद केली. तसेच बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्सचा ३४-२० असा पराभव केला.
पहिल्या लढतीत अमित राठीने सुरुवातीलाच चार गुण घेत यू मुंबाचा आत्मविश्वास कमकुवत केला. या बळावर बंगळुरू बुल्सने मध्यंतराला २१-१० अशी आघाडी घेताना यू मुंबावर ९व्या आणि १९व्या मिनिटाला लोण चढवले होते. परंतु उत्तरार्धात यू मुंबाने आपल्या बचावात सुधारणा केली. बंगळुरूचे चार खेळाडू शिल्लक असताना त्यांच्याकडे ४ गुणांची आघाडी होती. त्या वेळी प्रभारी कर्णधार राकेश कुमारने चढाईत गुण मिळवला. त्यानंतर बंगळुरूच्या अमित राठीची पकड झाली. मग रिशांकने आणखी एक गुण मिळवला. त्यामुळे शेवटून दुसऱ्या चढाईत एकटय़ा उरलेल्या सुरजित नरवालवर बंगळुरूची मदार होती. मात्र यू मुंबाच्या दुसऱ्या फळीतील बचावाने त्याला जेरबंद केल्यामुळे बंगळुरूवर लोण पडला. त्यामुळे एका गुणाची आघाडी यू मुंबाकडे गेली आणि त्यांनी त्यानंतर कोणताही धोका न पत्करता विजयावर शिक्कामोर्तब केले.