मुंबई : यू मुंबाने घरच्या मैदानावर अपेक्षेप्रमाणेच विजयी सलामी देताना जयपूर पिंक पँथर्सचा ४८-२४ असा आरामात पराभव केला आणि अ-गटात आघाडीचे स्थान मिळवले आहे. प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या सहाव्या हंगामात जयपूरचे नेतृत्व करणारा अनुप कुमार यू मुंबाविरुद्ध पूर्णत: निष्प्रभ ठरला. अनुपने याआधीच्या पाचही हंगामांमध्ये यू मुंबाचे नेतृत्व केले होते.

वरळी येथील एनएससीआय स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात अनुपने बोनस गुणाद्वारे जयपूरचे खाते उघडले, मात्र तिसऱ्याच मिनिटाला त्याची पकड झाली. मग आठव्या मिनिटाला यू मुंबाने जयपूरवर पहिला लोण आणि १४व्या मिनिटाला दुसरा लोण चढवून मध्यंतराला २६-८ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात यू मुंबाने आणखी दोन लोण चढवले. यू मुंबाचा तारांकित चढाईपटू सिद्धार्थ देसाईला सामन्याची शेवटची दोन मिनिटे बाकी असताना मैदानावर आणण्यात आले.

जयपूरचे आव्हान फारसे गंभीर नव्हते, त्यामुळे आम्ही सिद्धार्थला विश्रांती दिली, असे यू मुंबाच्या संघ व्यवस्थापनाने सांगितले.

यू मुंबाकडून अभिषेक सिंग (१२ गुण), दर्शन कडियान (१० गुण) आणि विनोद कुमार (७ गुण) यांनी दिमाखदार चढाया केल्या, तर फझल अत्राचाली (५ गुण) आणि रोहित राणा (२ गुण) यांनी अप्रतिम पकडी करीत लक्ष वेधले. जयपूरकडून दीपक हुडा, अनुप आणि मोहित चिल्लरसारखे अनुभवी खेळाडू आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरले.

दुसऱ्या लढतीत बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सचा ३०-२५ अशा फरकाने पराभव केला. बंगालकडून मणिंदर सिंग, सुरजीत सिंग आणि रण सिंग यांनी शानदार खेळ केला. राहुल चौधरीने संघाचा पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केला.

आजचे सामने

पाटणा पायरेट्स वि. बंगाल वॉरियर्स

यू मुंबा वि. गुजरात फॉच्र्युन जायंट्स

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २