मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन. मुंबईतील सामान्य माणूस लोकलनेच प्रवास करतो, त्यामुळे मुंबईकरांना हे विजेतेपद अर्पण करण्याच्या दृष्टीने प्रो कबड्डीचे जेतेपद पटकावलेल्या यू मुंबा संघाने लोकलमधून प्रवास करत मुंबईकरांमध्ये मिसळून त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
अंधेरीतील हॉटेलमधून दुपारी दोन वाजता यू मुंबाचा संघ निघाला आणि जवळपास तीनच्या सुमारास त्यांनी रेल्वे स्टेशन गाठले. त्यानंतर सात नंबर फलाटावरून त्यांनी चर्चगेटची गाडी पकडली. संघ प्रथम श्रेणीमध्ये चढल्यावर काही जणांना स्वत:वर विश्वासच बसत नव्हता. काही तासांपूर्वी ज्यांनी प्रो कबड्डी लीगच्या जेतेपदाला गवसणी घातली, जे आमच्या सर्वाचे नायक झाले ते दस्तुरखुद्द लोकलमधून प्रवास करत असल्याचे पाहून साऱ्यांनाच सुखद धक्का बसला. सारेच त्यांच्या हातातील चषक न्याहाळत होते. तर काही जणं त्यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढून ही आठवण चिरतरुण ठेवण्याचा प्रयत्न करत होते, काही जण त्यांच्या स्वाक्षरी घेण्यासाठीही पुढे सरसावले आणि त्यांना या खेळाडूंनी निराश केले नाही. प्रत्येक मुंबईकराला आपलेसे करत हा चषक तुमचाच असल्याचे यू मुंबाचे खेळाडू मनोमनी म्हणत होते. काही खेळाडूंनी स्वत: चषकाबरोबर ट्रेनमध्ये ‘सेल्फी’ काढले.
चर्चगेटला स्टेशनवर उतरल्यावर साऱ्या खेळाडूंनी कर्णधार अनूप कुमारला आपल्या खांद्यावर उचलून घेत त्याची छोटेखानी मिरवणूकही काढली. हे जेतेपदाचे सेलिब्रेशन करण्यात मुंबईकरही मागे नव्हते. चर्चगेट स्टेशनवर हे खेळाडू आल्यावर मुंबईकरांनी एकच जल्लोष केला. स्टेशनवरून भुयारी मार्गातून एशियाटीकपर्यंत जाईपर्यंत सारा परीसर जयघोषाने दुमदुमला होता. तिथून खुल्या जीपमधून या खेळाडूंची मिरवणूक काढण्यात आली. काही खेळाडूंनी दुचाकीवरून हा प्रवास केला. पहिल्यांदा या खेळाडूंनी मरीन ड्राइव्हला फेरफटका मारला, त्यानंतर फॅशन स्ट्रीटवरून ते प्रेस क्लबजवळ आले. प्रेस क्लबमध्ये त्यांनी केक कापत आपला आनंद द्विगुणित केला.