पुणेरी पलटणने अतिशय झोकात सामन्याला प्रारंभ केला. मध्यंतराला त्यांच्याकडे एका गुणाची आघाडीसुद्धा होती, परंतु दुसऱ्या सत्रात राहुल चौधरीने कमाल केली. त्याच्या चौफेर चढायांपुढे पुण्याचा संघ निरुत्तर ठरला. त्यामुळे तेलुगू टायटन्सने पुणेरी पलटणचा ४५-२४ असा आरामात पराभव करून प्रो कबड्डी लीगमध्ये आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. तसेच यू मुंबाने विजयाची हॅट्ट्रिक साकारताना राकेश कुमारच्या नेतृत्वाखालील बलाढय़ पाटणा पायरेट्सचा २५-२० असा फडशा पाडला. कर्णधार अनुप कुमार यू मुंबाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवरील सोमवारच्या पहिल्या सामन्यात पुण्याने दिमाखदार बचावाच्या बळावर पहिल्या सत्रात १४-१३ अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सत्रात तेलुगू टायटन्सकडून राहुल चौधरी आणि दीपक हुडा तर पुण्याकडून वझीर सिंगने यशस्वी चढायांचा सपाटा लावला. मात्र तेलुगू टायन्सने २५व्या मिनिटाला पहिला लोण चढवून सामन्यावर नियंत्रण मिळवले. मग २९व्या आणि ३९व्या मिनिटाला आणखी दोन लोण चढवून सामन्यावर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. राहुलने चढायांचे ८ आणि पकडींचे २ गुण मिळवले. दीपक हुडाने चढायांचे ६ गुण मिळवले. तर राजगुरू सुब्रमण्यम आणि संदीप यांनी बचावाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. पुण्याकडून वझीर आणि योगेश हुडाने चढायांचे प्रत्येकी ७ गुण मिळवले.
दुसऱ्या सामन्यात यू मुंबाने १९व्या मिनिटाला पहिला लोण चढवून पहिल्या सत्रात १७-१० अशी आघाडी घेतली होती. मग ती उत्तरार्धात टिकवून ठेवली. पाटणाच्या राकेशला एकही गुण कमावता आला नाही. अनुप कुमारने चढायांचे ६ गुण मिळवले आणि एक सुरेख पकड केली. शब्बीर बापू आणि रिशांक देवाडिगाच्या चढायांची त्याला छान साथ मिळाली. मोहित चिल्लर आणि जिवा कुमार यांच्या क्षेत्ररक्षणाने या विजयात मोलाची भूमिका बजावली. पाटणाकडून संदीप नरवालने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत चढायांचे ६ आणि पकडींचे २ गुण मिळवले.

मुंबई-पुण्यात आज लढत
यू मुंबा आणि पुणेरी पलटण या दोन महाराष्ट्राच्या संघांमध्ये मंगळवारी रंगणाऱ्या सामन्याकडे कबड्डीरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. यू मुंबाने गतवर्षी उपविजेतेपद पटकावले होते, तर पुण्याच्या संघाला मात्र फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. मात्र आता अर्जुन पुरस्कार विजेत्या अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या संघाने कात टाकली आहे. दमदार चढाया करणारा महिपाल, अष्टपैलू खेळाडू रवी कुमार आणि पकडपटू विजेंद्र यांच्या समावेशामुळे पुण्याच्या संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील यजमान यू मुंबाला हरवणे, हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

आजचा सामना
यू मुंबा वि. पुणेरी पलटण
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्टस् एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी