प्रो कबड्डी लीग आता काही दिवसांवर येऊन ठेपली असताना यू मुंबा संघाने नुकतीच एका उनाड दिवसाची अनुभूती घेतली. शहरांप्रमाणेच खेडेगावांमध्येही कबड्डीची लोकप्रियता किती पसरली आहे, हे या निमित्ताने समोर आले. यू मुंबाने रायगड जिल्ह्यातील माणगावचा दौरा केला. या दौऱ्यावरील अनेक गावांमध्ये यू मुंबा संघाचे जल्लोशात स्वागत करण्यात आले.

या दौऱ्यात यू मुंबा संघाने पर्यावरणाची जाण राखण्यासाठी वृक्षलागवड केली. याशिवाय गावांमधील अनेक ठिकाणांना भेट दिली. या संघाच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे कबड्डी सामनेसुद्धा झाले. सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार राकेश कुमार, रिशांक देवाडिगा आणि प्रशिक्षक ई. भास्करन यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. गावांमध्ये या संघाच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. याशिवाय खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी मोठी झुंबड उडली होती.

‘‘शिस्तबद्ध आयुष्य जगा आणि आजारपणापासून दूर राहा. उत्तम व्यायाम करा. गावातील खेळाडूंचा धसमुसळा खेळ पाहिला. असाच खेळ दिसला तर यू मुंबाच्या संघात तुमच्या गावातील खेळाडूसुद्धा दिसतील,’’ असा आशावाद प्रशिक्षक भास्करन यांनी प्रकट केला. तसेच राकेश कुमार म्हणाला, ‘‘गावाकडे आल्याचा मला अतिशय आनंद होतो आहे. मी आणि अनेक खेळाडू हे अशा गावांमधूनच घडलो आहोत. मेहनत करा आणि यश मिळवा.’’