प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामातील बाद फेरीला सोमवारपासून प्रारंभ होत असून, हरयाणा स्टीलर्सविरुद्ध यू मुंबाचे, तर गतविजेत्या बेंगळूरु बुल्सविरुद्ध यूपी योद्धाचे पारडे जड मानले जात आहे.

अहमदाबादच्या ट्रान्स्टॅडिया क्रीडा संकुलात होणाऱ्या एलिमिनेटर-१ सामन्यात यूपी योद्धाच्या आक्रमणाची धुरा श्रीकांत जाधववर असेल. सुरेंदर गिल, रिशांक देवाडिगा आणि मोनू गोयत यांच्यासारखे चढाईपटू त्यांच्याकडे आहेत. याचप्रमाणे सुमित, नितेश कुमार आणि अशू सिंग त्यांच्या बचावाची जबाबदारी सांभाळतील. बेंगळूरुची भिस्त यंदाच्या हंगामात चढायांचे ३०८ गुण मिळवणाऱ्या पवन शेरावतवर असेल. रोहित कुमारचे नेतृत्व तसेच महेंदर सिंग, सौरभ नांदल आणि अमित शेओरान यांचा बचाव हे बेंगळूरुच्या यशातील महत्त्वाचे मोहरे आहेत. गतवर्षी बेंगळूरुनेच यूपी योद्धाची जेतेपदाची वाटचाल बाद फेरीत रोखली होती.

एलिमिनेटर-२ सामन्यात यू मुंबाच्या चढायांची सूत्रे अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवाल तर बचावाची जबाबदारी फझल अत्राचाली आणि संदीप नरवाल यांच्यावर असेल. हरयाणा स्टीलर्सकडे प्रशांत कुमार राय, विकास खंडोला, विनय यांच्यासारखे दमदार चढाईपटू आहेत, तर सुनील, धरमराज चेरलाथन, रवी कुमार आणि विकास काळे संरक्षणाची धुरा सांभाळतील.

बाद फेरीचे वेळापत्रक

१४ ऑक्टोबर, सोमवार

* एलिमिनेटर-१, सायं. ७.३० वा.

यूपी योद्धा वि. बेंगळूरु बुल्स

* एलिमिनेटर-२, रात्री ८.३० वा.

यू मुंबा वि. हरयाणा स्टीलर्स