स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगच्या जेतेपदासाठी यू मुंबा आणि पाटणा पायरेट्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. उपांत्य फेरीत पाटणा पायरेट्सने झंझावाती खेळ करीत पुणेरी पलटणचे आव्हान ४०-२१ असे संपुष्टात आणले तर यू मुंबाने बंगाल वॉरियर्सला ४१-२९ असे नमवले.

इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत पाटणा संघाने पूर्वार्धातच २५-७ अशी आघाडी घेत विजय निश्चित केला होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत गतविजेत्या यू मुंबा संघाने पूर्वार्धात २६-८ अशी अठरा गुणांचीच आघाडी मिळविली होती. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकतर्फी झाल्यामुळे प्रेक्षकांची काही अंशी निराशाच झाली.

पाटणा संघाच्या विनोदकुमार, सुनीलकुमार व प्रदीप नरवाल यांनी मध्यभागी पकडी करण्याचे धक्कातंत्र उपयोगात आणले. त्यामुळे पुण्याचा कर्णधार मनजीत चिल्लर, अजय ठाकूर व सुरेंद्रसिंग हे सपशेल अपयशी ठरले. आठव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण चढविला. या धक्क्यातून पुण्याचा संघ सावरलाच नाही. त्यानंतर चारच मिनिटांनी पाटण्याच्या प्रदीप नरवाल याने एकाच चढाईत चार गडी टिपले. त्यामुळे पुण्यावर दुसरा लोण लागला. पकडीबाबत मनजीतचे अपयशही पुण्यासाठी नुकसानकारक ठरले. प्रथमच बाद फेरीत खेळण्याचे दडपणही त्यांच्यावर दिसून आले. पूर्वार्धात पाटणा संघाने अठरा गुणांची आघाडी घेतल़ी होती.

उत्तरार्धाच्या प्रारंभी पुण्याने जोरदार पकडी व खोलवर चढाया केल्या. अर्थात पाटणा संघाच्या खेळाडूंमध्ये आलेली शिथिलता त्यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे २६ व्या मिनिटाला पाटणा संघावर लोण चढविला गेला. पुण्यासाठी या सामन्यातील ही एकमेव जमेची बाजू ठरली. तथापि ३४ व्या मिनिटाला पाटणा संघाने तिसरा लोण नोंदवीत त्याची परतफेड केली. पाटणा संघाच्या विजयात प्रदीप नरवाल व रोहितकुमार यांनी केलेल्या चढायांचाही मोठा वाटा होता.

अनुपकुमार याच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर मुंबा संघाने नवव्या मिनिटाला पहिला लोण नोंदवीत सामन्यावर नियंत्रण मिळविले. रिशांक देवडिगा याच्या जोरदार चढायांमुळे त्यांनी १५ व्या मिनिटाला आणखी एक लोण चढवीत सामन्यावरील पकड मजबूत केली. बंगालच्या खेळाडूंनी पकडीबाबत केलेल्या चुकाही मुंबा संघाच्या पथ्यावर पडल्या. बंगालच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाचा अभावच दिसून आला.

धडाकेबाज चढाया व मजबूत पकडी असा चतुरस्र खेळ करीत मुंबा संघाने उत्तरार्धात सामन्याच्या २७ व्या मिनिटाला आणखी एक लोण चढविला. त्यामध्ये फाजल अत्राचली व मोहित चिल्लर यांनी केलेल्या पकडींचाही महत्त्वाचा वाटा होता. ३४ व्या मिनिटाला बंगाल संघाने लोण नोंदवीत काही अंशी उत्सुकता निर्माण केली. मात्र मुंबा संघाकडे असलेली मोठी आघाडी ते तोडू शकले नाहीत. मुंबा संघाकडून रिशांक याने तेरा गुण मिळविले. अनुपकुमार व मोहित चिल्लर यांनी प्रत्येकी सहा गुणांची कमाई केली. बंगालकडून नितीन तोमर व उमेश म्हात्रे यांनी संघर्ष केला.

आज होणारे सामने

यू मुंबा विरुद्ध पाटणा पायरेट्स

पुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्स (तिसऱ्या क्रमांकासाठी)

वेळ : रात्री आठ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स २, ४ आणि एचडी वाहिन्यांवर

मोठे स्टेडियमचा प्रयोग अयशस्वी : बाद फेरीच्या लढतींना प्रेक्षागृह हाऊसफुल्ल असेल असे गृहीत धरून हे सामने पंधरा हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले गांधी स्टेडियम घेण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात एकतृतीयांश स्टेडियमही भरले नव्हते.