कर्णधार मनजित चिल्लरच्या चुकीच्या नियोजनामुळे पुणेरी पलटण संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुंबा संघाकडून शेवटच्या मिनिटात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी हा सामना २९-२७ असा जिंकला. शेवटच्या १५ सेकंदात लोण नोंदवित तेलगु टायटन्स संघाने जयपूर पिंक पँथर्सवर २७-२५ असा रोमहर्षक विजय मिळविला. प्रेक्षकांना आपले पैसे वसूल झाल्याचा आनंद मिळाला.

पुणे संघाला तिसऱ्या सामन्यातही यू मुंबा संघाविरुद्ध बरोबरीची संधी मिळाली होती. मात्र शेवटच्या चढाईत पुण्याचा कर्णधार मनजित चिल्लरची पकड करीत यू मुंबा संघाने सामना आपल्या बाजूने केला. पूर्वार्धात यू मुंबा संघाच्या खेळाडूंनी सुरेख सांघिक कौशल्य दाखविले. १९-२१ अशी पिछाडी असताना त्यांनी लोण चढविला. हा लोण पुण्यासाठी महाग ठरला. मुंबा संघाने ३५ व्या मिनिटाला २७-२४ अशी आघाडी मिळविली होती. ३८ व्या मिनिटाला पुण्याने २७-२७ अशी बरोबरी साधली. त्यावेळी पुण्याचा संघ तिसरा सामनाही बरोबरीत ठेवणार असे वाटले होते. मात्र शेवटच्या क्षणातील घाई त्यांच्या अंगाशी आली. यू मुंबा संघाच्या विजयात राकेशकुमार व रिशांक देवडिगा यांचा मोठा वाटा होता.

तेलगु संघाने पूर्वार्धात १२-९ अशी आघाडी घेतली होती. जयपूरच्या खेळाडूंनी पकडी व चढाया या दोन्ही आघाडय़ांवर केलेल्या चुकांचाही फायदा तेलगु संघाला झाला. मात्र उत्तरार्धात जयपूरच्या खेळाडूंनी खेळावर नियंत्रण आणले. त्यांनी सामन्याच्या २३ व्या मिनिटाला १२-१२ अशी बरोबरी साधली. २६ व्या मिनिटाला त्यांनी दोन गुणांची आघाडी घेतली. त्यांच्या समरजितसिंग व कुलदीपसिंग यांनी प्रत्येकी एक सुपरटॅकल करीत संघाच्या बाजूने खेळ पालटविला. ३५ व्या मिनिटाला त्यांच्याकडे २२-१६ अशी चांगली आघाडी होती. मात्र तेलगु संघाकडून खेळणारा इराणचा खेळाडू मिराज शेख याने सुपरटॅकल करीत जयपूरची आघाडी कमी केली.

सामन्याची दोन मिनिटे बाकी असताना त्यांनी २३-२३ अशी बरोबरी होती. जयपूरने पुन्हा दोन गुणांची आघाडी मिळविली. मिराजने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तेलगु संघाने अखेरच्या तीस सेकंदात लोण चढविला आणि सनसनाटी विजयश्री खेचून आणली.

आजचे सामने

यू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्स

पुणेरी विरुद्ध बंगळुरू बुल्स

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स