अनूप कुमारच्या कणखर नेतृत्वाच्या जोरावर यू मुंबा संघाने प्रो कबड्डी लीगमधील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. श्री कांतीरावा स्टेडियममध्ये झालेल्या आजच्या पहिल्याच सामन्यात यजमान बंगळुरू बुल्सला आघाडी घेण्याची संधी न देता यू मुंबाने त्यांना ३६-२९ असे पराभूत केले. या विजयासह यू मुबांने ५० गुणांसह पहिले स्थान कायम राखले.
बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात यू मुंबाने दमदार बचावाचे प्रात्यक्षिक दाखवत तब्बल १९ गुणांची कमाई केली. सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर यांनी प्रत्येकी ५ पकडी करत बंगळुरू बुल्सच्या आक्रमणातील हवा काढून घेतली. त्यांना जिवा कुमार आणि विशाल माने यांनी चांगले सहकार्य केले. बंगळुरू बुल्सवर १२ व्या मिनिटाला पहिला लोण चढवत यू मुंबाने मध्यंतराला १८-१३ अशी आघाडी घेतली.
कर्णधाराची रणनिती कशी असावी, याचा उत्तम नमुना यू मुंबांच्या अनूप कुमारने दाखवला. बंगळुरुचा कर्णधार मनजित चिल्लरला २० मिनिटे मैदानाबाहेर ठरवत संघ खिळखिळा केला. अखेरच्या क्षणी मनजितने काही गुण मिळवले खरे, पण यू मुंबांने दमदार आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला होता. बंगळुरू बुल्सच्या अजय ठाकूर, प्रदीप नरवाल या चढाईपटूंच्या सतत पकडी होत गेल्यामुळे त्यांना बचावावर भर द्यावा लागला. पण त्याचा फरसा फायदा काही त्यांना झाला नाही. भुपेंदरने चढाईत चार गुण घेताना बंगळुरू बुल्सवर ३६ व्या मिनिटाला दुसरा लोण चढवण्यात मोठा वाटा उचलला. रिशांक देवाडिगाने सुरुवातीला यू मुंबाला चढाईत गुण मिळवून दिले. यू मुंबाचा आघाडीचा आक्रमकपटू शब्बीर बापू या सामन्यातही मदानात उतरला नाही. तरीही यू मुंबाच्या कामगिरीतील विजयाचं सातत्य कायम राहिलंय. यजमान बंगळुरू बुल्सचे १० सामन्यांमधून ३२ गुण झाले आहेत.

३६-२९ असा विजय
आजचे सामने
बंगाल वॉरियर्स वि. पुणेरी पलटण
बंगळुरू बुल्स वि. जयपूर पिंक पँथर्स
वेळ : रात्री ७.५० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी.