प्रकरणाला जातीय रंग न देण्याचे प्रणव धनावडेच्या वडिलांचे आवाहन

‘‘जोपर्यंत द्रोणाचार्य जिवंत आहेत, तोपर्यंत एकलव्य असाच अर्जुनाकडून हरत राहणार.. सचिनचा मुलगा या व्यतिरिक्त जास्त काही कर्तृत्व नसलेल्या अर्जुन तेंडुलकरला पश्चिम विभागीय १६ वर्षीय संघात स्थान.. तर ३२७ चेंडूंत नाबाद १००९ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारणारा रिक्षाचालकाचा मुलगा प्रणव धनावडेवर अन्याय..’’ गेल्या काही दिवसांत समाज माध्यमांवरील या संदेशांनी तेंडुलकरच्या पुत्राला ‘आज का अर्जुन’ ठरवून या पिता-पुत्रांवर टीकेचा भडिमार सुरू आहे, तर ‘अन्यायग्रस्त’ क्रिकेटपटू प्रणवला ‘एकलव्य’ ठरवून त्याच्याबाबत जनमानसात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. मात्र मुळात समाज माध्यमातली चर्चा गैरसमजातून होत असल्याने वास्तवाला ठेंगा दाखवला जात आहे. या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन त्याच्या वडिलांनीही केले आहे.

आंतरविभागीय स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या १६ वर्षांखालील पश्चिम विभागाच्या संघात हजार धावा करणाऱ्या प्रणव धनावडेला वगळून अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली, अशी बातमी आता समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली आहे.

प्रणवचा जन्मदिनांक १३ मे २००० आहे आणि अर्जुनचा जन्मदिवस २४ सप्टेंबर १९९९ आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, नियमानुसार १ सप्टेंबर १९९९नंतर जन्मलेला कुणीही या संघात पात्र आहे. मात्र प्रणवने १६ वर्षांखालील वयोगटासाठीच्या प्रक्रियेत भागच घेतला नव्हता, त्यामुळे त्याच्या निवडीचा प्रश्नच येत नाही.

प्रणववर कोणताही अन्याय झाला नसल्याचे ‘लोकसत्ता’ला स्पष्ट करताना त्याचे वडील प्रशांत धनावडे म्हणाले की, ‘‘मुळात पश्चिम विभागीय संघासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत प्रणवचा सहभागही नव्हता. मग त्याची निवड कशी होऊ शकते. त्याच्यावर अन्याय करून अर्जुन तेंडुलकरला निवडण्यात आले, या बातम्या चुकीच्या आहेत. प्रणववर कोणताही अन्याय झालेला नाही. कुणी तरी चुकीच्या माहितीच्या आधारे बातम्या पसरवत आहे. समाज माध्यमावर पसरवण्यात आलेली ही बातमी चुकीची असून, त्याला उगाच जातीय रंग देण्यात येत आहे.’’

मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाच्या निवड स्पध्रेत प्रणवने सहभाग घेतला होता. १५ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मुंबई परिसरातील १६ केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती, परंतु प्रणव खेळत असलेला संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. या स्पध्रेच्या अंतिम लढतीत डॉ. डी. वाय. पाटील संघाने ४ विकेट्स राखून मुलुंड जिमखान्यावर विजय मिळवला.

‘‘मुंबईच्या १६ वर्षांखालील संघात प्रणवचा सहभाग नव्हता. त्यामुळे त्याची येथे निवड होण्याची  अपेक्षा करणे चुकीचे आहे. आता त्याने १९ वर्षांखालील मनोहर सावंत चषक स्पध्रेत सहभाग घेतला होता, परंतु त्याचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. अर्जुन आणि प्रणव यांच्यात चांगली मैत्री आहे,’’ असे त्याच्या वडिलांनी सांगितले. मुंबई क्रिकेटमधील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.