नेपाळच्या क्रिकेट संघाची सध्या प्रचंड चर्चा आहे. २६ जानेवारीला झालेल्या एका सामन्यात नेपाळचा तरुण खेळाडू रोहित पौडेल याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला होता. युएई विरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर आता नेपाळच्या क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला शतकवीर मिळाला आहे.

नेपाळ विरुद्ध युएई यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात सोमवारी नेपाळचा कर्णधार पारस खडका याने शतक ठोकले. नेपाळकडून हे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. पारसने १०९ चेंडूत ११५ धावांची तडफदार खेळी केली. तब्बल १५ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने आपली खेळी सजवली आणि आपले शतक साजरे केले. याबरोबरच त्याने नेपाळच्या क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले.

ICCने त्याचे ट्विट करून अभिनंदन केले आहे. दरम्यान, नेपाळ आणि युएई यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. ही मालिका १-१ अशी बरोबरीत असून तिसऱ्या सामन्यात नेपाळला विजयासाठी २२५ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यावेळी आव्हानाचा पाठलाग करताना पारसने ही शानदार खेळी केली.