करोनामुळे सध्या स्थगित करण्यात आलेल्या इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा, चॅम्पियन्स लीगसारख्या सर्वच स्पर्धाच्या लढती जुलैपासून सुरू करण्यासाठी युरोपियन फुटबॉल संघटना (यूएफा) प्रयत्नशील आहे.

फुटबॉल लीगचा नवा हंगाम ऑगस्टअखेरीस सुरू होतो. मात्र सध्याच्या हंगामातील उर्वरित लढती खेळवण्याचा ‘यूएफा’चा प्रयत्न आहे. बेल्जियममधील अव्वल लीग स्पर्धेने त्यांचा हंगाम संपल्याचे जाहीर करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. त्याउलट ‘यूएफा’ने मात्र लढती खेळवण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.

‘‘सध्याच्या स्थितीत फुटबॉलचा हंगाम संपल्याचे जाहीर करणे योग्य नाही,’’ असे ‘यूएफा’चे अध्यक्ष अलेक्झांडर सेफेरिन, युरोपियन क्लब संघटनेचे (ईसीए) अध्यक्ष आंद्रेआ अ‍ॅगनेली आणि आणि युरोपियन लीगचे (ईएल) अध्यक्ष लार्स ख्रिस्तर ऑल्सन यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या हंगामात युरोपातील प्रत्येक लीगमधील १० लढती बाकी आहेत.

सध्याच्या हंगामातील लढती जर जुलैपासून सुरू करण्यात यश आले तर त्याचा परिणाम पुढील हंगामातील लढतींच्या वेळापत्रकावर होणार नाही. त्याचवेळेला ‘यूएफा’ फुटबॉलच्या बिघडलेल्या आर्थिक गणिताचाही आढावा घेणार आहे. करोनामुळे ‘यूएफा’कडून जूनपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय लढतीदेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरोपात चार वर्षांनी होणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धादेखील एका वर्षांने लांबणीवर टाकण्यात आली आहे.

सामने कधी सुरू होतील, याबाबत अनभिज्ञ -इन्फॅन्टिनो

फुटबॉलचे सामने पुन्हा कधी सुरू होतील, हे माहिती नाही, असे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष गियानी इन्फॅन्टिनो यांनी सांगितले. करोना विषाणू संसर्गाने सध्या जगात कहर केलेला असताना फुटबॉल ही महत्त्वाची बाब नसल्याचेही ते म्हणाले. ‘‘फुटबॉलचे सामने उद्यापासून सुरू झाले तरी सर्वाना हवे आहेत. सध्याच्या स्थितीत दुर्दैवाने ते शक्यदेखील नाही. पुन्हा फुटबॉलचे सामने सुरू झाले तर त्यांचे कसे स्वरूप असेल, याबाबतही अंदाज वर्तवणे कठीण आहे. फुटबॉल खेळाला कठीण स्थितीत टिकवण्याचे आव्हान आहे,’’ असे इन्फॅन्टिनो म्हणाले.

मेसीपाठोपाठ सुआरेझ वेतनकपातीमुळे नाराज

बार्सिलोनाचा खेळाडू लुईस सुआरेझने खेळाडूंच्या वेतनकपात करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. लिओनेल मेसीने सर्वप्रथम या वेतनकपातीवर टीका केली होती. ‘‘बार्सिलोना संघव्यवस्थापनाने खेळाडूंच्या मानधनातून ७० टक्के कपात करताना आमच्याशी बोलणी करण्याची गरज होती. खेळाडूंचे आणि बार्सिलोना क्लबच्या कर्मचाऱ्यांचेही नुकसान होणार नाही, असा मार्ग काढता आला असता,’’ असे सुआरेझने सांगितले.

‘एआयएफएफ’चे खेळाडूंना तंदुरुस्तीचे धडे

नवी दिल्ली : सध्या देशातील टाळेबंदीमुळे घरात असणाऱ्या फुटबॉलपटूंना अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) व्हिडियोद्वारे तंदुरुस्तीचे धडे देत आहे. ‘फिट विथ इंडियन फुटबॉल’ हा ‘हॅशटॅग’ वापरून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. पुरुष आणि महिलांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ तसेच महिलांचा १७ वर्षांखालील विश्वचषकातील मुलींचा संघ हे ‘एआयएफएफ’च्या मोहिमेद्वारे सर्वसामान्यांना घरात राहताना तंदुरुस्ती कशी राखावी याचे धडे देत आहेत. याची सुरुवात भारताचा माजी कर्णधार बायच्युंग भूतियाने व्हिडियोद्वारे केली.