मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी हे इंग्लिश प्रीमिअर लीगमधील दोन्ही तगडे संघ रविवारी आमनेसामने येणार असून पराभूत होणाऱ्या संघाचे जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान धोक्यात येण्याची शक्यता आहे.नव्या मोसमाला सुरुवात होऊन फक्त चारच सामने झाले असले तरी दोन्ही संघांना अपेक्षेप्रमाणे सुरुवात करता आलेली नाही. युनायटेडने घरच्या मैदानावर चेल्सीशी बरोबरी पत्करली तर लिव्हरपूलकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मँचेस्टर सिटीला स्टोक सिटीने बरोबरीत रोखले आणि कार्डिफ सिटीने पराभूत केले. त्यामुळे दोन्ही संघांचे सात गुण झाले आहेत. आघाडीवर असणाऱ्या लिव्हरपूलपेक्षा ते तीन गुणांनी मागे आहेत. पराभूत होणारा संघ सहा गुणांनी मागे पडेल आणि ही पिछाडी भरून काढणे कठीण जाऊ शकते. ‘‘ईपीएलमधील बलाढय़ संघांविरुद्ध आम्हाला चांगली सुरुवात करता आली नाही. पण यापुढे आम्ही तगडय़ा संघांविरुद्घही गुण वसूल करण्याचा प्रयत्न करू. मँचेस्टर सिटीविरुद्धच्या सामन्यानंतर आम्हाला दोन ते तीन बलाढय़ प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळावयाचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या या सामन्यांत आमची कामगिरी चांगली होईल, अशी आशा आहे,’’ असे मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक डेव्हिड मोयेस यांनी सांगितले.