विश्वविजेत्या फ्रान्सचा १-० असा विजय

म्युनिक : युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील सर्वाधिक खडतर गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘फ’ गटातील लढतींची चाहत्यांना फार पूर्वीपासून प्रतीक्षा होती. सर्वाच्या अपेक्षेनुसार मंगळवारी मध्यरात्री झालेला फ्रान्स- जर्मनी यांच्यातील सामना रोमांचकही झाला. मात्र जर्मनीच्या मॅट्स हुमेल्सने केलेला स्वयंगोल विश्वविजेत्या फ्रान्सच्या पथ्यावर पडल्याने त्यांनी १-० असा विजय मिळवला.

म्युनिक येथील अलायन्स एरिना येथे झालेल्या या लढतीत खरेतर फ्रान्सने आणखी दोन ते तीन गोलच्या फरकाने विजय मिळवला असता. परंतु किलियान एम्बापे आणि करिम बेन्झेमा यांनी नोंदवलेले गोल ऑफ-साइड ठरवण्यात आले. युरो चषकासाठी संघात खास बोलावण्यात आलेल्या हुमेल्सच्या स्वयंगोलमुळे मात्र जर्मनीच्या चिंतेत वाढ झाली आहे.

या विजयासह फ्रान्सने ‘फ’ गटात तीन गुणांसह दुसरे स्थान मिळवले असून हंगेरीला नमवणारा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ सध्या सरस गोलफरकाच्या बळावर गटात अग्रस्थानी आहे. आता शनिवारी पोर्तुगालविरुद्ध होणाऱ्या लढतीत जर्मनीला विजय मिळवणे अनिवार्य असेल. त्याच दिवशी फ्रान्सची हंगेरीशी गाठ पडणार आहे.

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या दिदिएर देशाँ यांच्या प्रशिक्षणाखालील फ्रान्सने जोकिम ल्यू यांच्या मार्गदर्शनाखाली अखेरची फुटबॉल स्पर्धा खेळणाऱ्या जर्मनीवर संपूर्ण सामन्यादरम्यान वर्चस्व गाजवले. २०व्या मिनिटाला फ्रान्सच्या लुकास हर्नाडेझने दिलेल्या पासला एम्बापेपर्यंत पोहोचण्यापासून वाचवण्यासाठी हुमेल्स धावला आणि त्याच्याच पायाला लागून चेंडू गोलजाळ्यात विसवल्याने फ्रान्सच्या नावावर सामन्यातील एकमेव गोलची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा तिसरा स्वयंगोल आहे.

मिरानचूकमुळे रशियाचा विजय

सेंट पीटर्सबर्ग : अ‍ॅलेक्सी मिरानचूकने पहिल्या सत्रातील भरपाई वेळेत केलेल्या एकमेव गोलच्या बळावर रशियाने युरो चषकातील बुधवारच्या पहिल्या सामन्यात फिनलंडवर

१-० अशी मात केली. या विजयासह रशियाने गुणांचे खाते उघडताना ‘ब’ गटात दुसरे स्थान मिळवले. डेन्मार्कला नमवणाऱ्या फिनलंडला सलग दुसरा विजय मिळवण्यात अपयश आले. २२ जून रोजी फिनलंडची बेल्जियमशी, तर रशियाची डेन्मार्कशी गाठ पडणार आहे.

फर्नाडिस रुग्णालयात दाखल

रशियाचा बचावपटू मारिओ फर्नाडिस लढतीच्या २६व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करण्याच्या प्रयत्नात जोरात पाठीवर कोसळला. त्यामुळे त्याला त्वरित मैदानाबाहेर नेण्यात आले. फर्नाडिसच्या पाठीच्या स्नायूंना दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

वेल्स अग्रस्थानी

’  बाकू : आरोन राम्से (४२वे मिनिट) आणि कोनोर रॉबर्ट्स (९०+५) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर वेल्सने बुधवारी युरो चषकात टर्कीवर २-० असा विजय मिळवला. स्वित्र्झलडविरुद्ध बरोबरी पत्करणाऱ्या वेल्सने (दोन सामन्यांत चार गुण) या विजयासह ‘अ’ गटात अग्रस्थान मिळवले. टर्कीचा मात्र सलग दुसरा पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

बेल्जियमविरुद्ध डेन्मार्कची कसोटी

’  कोपनहेगन : ख्रिस्तियन एरिक्सनसोबत झालेल्या घटनेतून सावरणाऱ्या डेन्मार्कला गुरुवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बलाढय़ बेल्जियमचा सामना करायचा आहे. त्यामुळे या लढतीत डेन्मार्कच्या खेळाडूंच्या मानसिक कणखरतेचा कस लागेल. तंदुरुस्त केव्हिन डीब्रुएने या लढतीसाठी उपलब्ध असल्याने बेल्जियमची बाजू बळकट झाली आहे. गुरुवारी होणाऱ्या अन्य दोन लढतींमध्ये युक्रेन-उत्तर मॅसेडोनिया, नेदरलँड्स-ऑस्ट्रिया आमनेसामने येतील.