यूरो कप २०२० स्पर्धेत स्कॉटलंड आणि चेक रिपब्लिक संघ आमनेसामने आले होते. ‘ड’ गटातील या सामन्यात चेक रिपब्लिक संघाने स्कॉटलंडवर २-० असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्कॉटलंड संघ दबावात खेळताना दिसून आला. चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक चिकने ४२ आणि ५२व्या मिनिटाला दोन अफलातून गोल नोंदवत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

या दोन गोलपैकी चिकने ५२व्या मिनिटाला नोंदवलेला गोल जबरदस्त होता. मैदानाच्या अर्ध्या म्हणजे ४९.७ मीटर यार्डातून त्याने हा गोल केला. चिकने मारलेला फटकाल स्कॉटलंड संघाचा गोलरक्षक डी मार्शलने अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र तो पुढे आल्यामुळे त्याला हा गोल वाचवता आला नाही. मागे जाऊन गोल वाचवण्याच्या नादात मार्शल जाळ्यात घुसला होता. १९८०च्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये ४९.७ मीटर यार्डातून एक गोल करण्यात आला होता, त्यानंतर चिकने ४१ वर्षानंतर असा गोल मारण्यात यश मिळवले.

हेही वाचा – सुशांतचं क्रिकेट ‘कनेक्शन’, मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटरला दिलं होतं फलंदाजीचं प्रशिक्षण!

 

फिफा क्रमवारीत स्कॉटलंडचा संघ ४४व्या स्थानावर, तर चेक रिपब्लिकचा संघ ४०व्या स्थानावर आहे. स्कॉटलंडचा विश्वचषक आणि यूरो कप या दोन मोठ्या स्पर्धेतील ११वा सामना होता. स्कॉटलंडने गेल्या नोव्हेंबरमध्ये सर्बियाविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात विजय मिळवल्यानंतर यूरो २०२० स्पर्धेसाठी पात्र झाला होता.

चेक रिपब्लिक संघाचा इतिहास

चेक रिपब्लिक संघ पूर्वी चेकोस्लोवाकिया म्हणून खेळत होता. १९७६ मध्ये संघानेही यूरो कप जिंकला होता. १९९६मध्ये त्यांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. १९९६पासून चेक रिपब्लिक संघ शेवटच्या ६ प्रमुख स्पर्धांपैकी ४ स्पर्धांमध्ये गट साखळीतून बाहेर पडला आहे. यूरो कपमध्ये संघाला शेवटच्या ९ सामन्यांपैकी ६ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते