यूरो कप स्पर्धेला दणदणीत सुरुवात झाली आहे. आज सोमवारी ई गटातील सामन्यात पोलंड आणि स्लोवाकिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. या गटातील पहिल्या सामन्यात स्लोवाकियाने सुपरस्टार रॉबर्ट लेवांडोव्स्कीच्या पोलंडचा २-१ असा पराभव केला. सेंट पीटर्सबर्गच्या क्रेस्टोव्स्की स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. सामन्याच्या पहिल्या सत्रात स्लोवाकियाने एक गोल करत आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या सत्रात पोलंडने बरोबरी साधली. ६९व्या मिनिटाला स्क्रिनियारने दुसरा गोल केल्याने स्लोवाकियाने ही आघाडी शेवटपर्यंत राखली. या लढतीनंतर शेवटच्या आठ सामन्यात पोलंडला फक्त एकच विजय मिळवता आला आहे.

दुसरे सत्र

दुसऱ्या सत्रात पोलंडने पुनरागमन करत पहिला गोल केला. कारोल लिनेट्टीने ४६व्या मिनिटाला गोल करत स्लोवाकियाशी बरोबरी साधली. सामन्याच्या ६२व्या मिनिटाला क्रिचिवीओकच्या चुकीमुळे दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आले. क्रिचिवीओक बाहेर गेल्याच्या सात मिनिटानंतर स्लोवाकियाने आपले आक्रमण वाढवत अजून एक गोल करत आघाडी घेतली. स्क्रिनियारने हा गोल नोंदवला. स्लोवाकियाने आपला बचाव आणि आक्रमण यांचे सुंदर मिश्रण करत ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. अतिरिक्त वेळेत पोलंडला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले.

 

 

पहिले सत्र

स्लोवाकियाने सुरुवातीपासूनत पोलंडवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. पहिल्या १० मिनिटांच्या आत पोलंडला गोल करण्यासाठी अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचे खेळाडू अपयशी ठरले. सामन्याच्या १३व्या मिनिटाला स्लोवाकियाने गोल करण्याची संधी चुकवली. पण रॉबर्ट माकने १८व्या मिनिटाला पोलंडच्या तीन बचावपटूंना भेदत स्लोवाकियासाठी पहिला गोल केला. त्यानंतर टॉमस हुबॉकॉला पहिले पिवळे कार्ड मिळाले. २१व्या मिनिटाला पोलंडच्या क्रिचिवीओकने स्लोवाकियाच्या खेळाडूला पाडल्यामुळे त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. पहिले सत्र संपेपर्यंत स्लोवाकियाचा संघ अधिक चपळ दिसून आला. पहिल्या सत्रात पोलंडने ७ तर स्लोवाकियाने ६ फाऊल केले.